सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ ; पाहा आजचा दर

0

नवी दिल्ली – अमेरिकेच्या कारवाईत इराणचा लष्करप्रमुख मारला गेल्याने मध्य पुर्वेवरील युध्दाचे ढग गडद झाले आहेत. त्याचा परिणाम सलग चौथ्या दिवशी इंधन दरवाढ होण्यात झाला आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर 9 पैशांनी, तर डिझेलची किंमत 11 पैशांनी वाढली. त्यामुळे पेट्रोलची किंमत दिल्लीत 75 रुपये 54 पैसे, तर डिझेलची किंमत 68 रुपये 51 पैशांवर पोहोचली. जागतिक बाजारपेठेत याचे परिणाम अधिक तीव्र झाले असून कच्च्या तेलाची किंमत तीन टक्‍क्‍यांनी वाढली.

सोलिमनी यांच्या हत्येने भौगोलीक राजकीय संघर्षाची भीती वाढली आहे. त्यामुळे इराण आणि अमेरिकेत संघर्ष होण्याची दाट शक्‍यता आहे. त्याचा परिणाम इराण आणि अमेरिकेच्या थेट युध्दात होऊ शकतो, असे भाकित ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍सने वर्तवले आहे.

भारतातील इंधनापैकी 84 टक्के इंधन आयात केले जाते. एवढेच नव्हे तर भारतात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलाचे दरही आंतरराष्ट्रीय दराप्रमाणेच असतात. मध्य पुर्वेतून होणाऱ्या तेल पुरवठ्यापैकी दोन तृतियांश पुरवठा हा सौदी अरेबिया आणि इराकमधून होतो. भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्यात तातडीने कोणतीही कपात होण्याची शक्‍यता नसली तरी त्याचा दरवाढीवर पणिाम होणार आहे.

सहा वर्षांत सर्वात कमी विकासदर म्हणजे 4.5 टक्के असताना देशाला वाढणाऱ्या इंधन किंमतीचा मोठा फटका बसण्याचा धोका आहे. त्यामुळे केवळ चलनवाढच होणार आहे असे नव्हे तर सरकारला या इंधनावरील अनुदानही वाढवावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.