सम्यक जैन महिला मंडळाचा आगळावेगळा उपक्रम!

0

आजपासून ब्लू काईट शॉपींग फेस्टीवलचे आयोजन : व्यवस्थानशास्त्रच्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्यक्ष अनुभव
जळगाव, दि.9 – शहरात विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविणार्‍या सम्यक जैन महिला मंडळातर्फे एक आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जळगावातील उत्पादनांना बाजारपेठ मिळावी आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अनुभवाची संधी मिळावी यासाठी ब्लू काईट शॉपींग फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि.10 पासून 13 पर्यंत आयोजित या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
एकता पतसंस्थेच्या एकता हॉलमध्ये दि.9 रोजी आयोजित या पत्रकार परिषदेला सम्यक जैन महिला मंडळाच्या अध्यक्षा उज्वला टाटीया, सिमा खिंवसरा यांच्यासह ललीत बरडीया, पारस टाटीया, प्रदीप खिंवसरा, नितीन चोरडीया आदी उपस्थित होते.
चार दिवस आयोजन, दररोज लकी ड्रॉ
लेवा बोर्डींग हॉलमध्ये दि.10 ते 13 जानेवारी दरम्यान ब्लू काईट शॉपींग फेस्टीवलचे आयोजन करण्यात आले असून प्रदर्शन सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहे. उद्या दि.10 रोजी दुपारी 4 वाजता जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते फेस्टीवलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. जळगावकरांना आकर्षित करण्यासाठी फेस्टीवलमध्ये दररोज दिवसातून तीन वेळा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. प्रत्येक लकी ड्रॉ वेळी तीन ग्राहकांना भेटवस्तू देण्यात येणार आहे.
विविध प्रकारचे 37 स्टॉल
चार दिवस चालणार्‍या या  प्रदर्शनात महिला उद्योजक, व्यापारी वा व्यावसायिक यांच्या मार्फत बेकरी प्रॉडक्टस, अगरबत्ती, इमीटेशन ज्वेलरी, नमकुन, मुखवास, ब्रैण्डेड व उबदार कपडे, जैम, सॉस, कैचप, साड्या, कुर्ती, घरगुती उपकरणे, चहा पावडर, मसाले, ई बाईक्स, नमकीन, लाडू तयार करण्याचे पदार्थ, बुलेट व दुचाकी वाहने, सौंदर्य प्रसाधने आदी उत्पादने विक्रीचे 37 स्टॉल राहणार आहे. त्याठिकाणी उत्पादने पाहणीसाठी व विक्रीस उपलब्ध असणार आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार संधी
जळगाव शहरात एमबीए आणि व्यवसाय व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना या महोत्सवात प्रत्यक्ष अनुभवाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. फेस्टीवलमधील प्रत्येक स्टॉलवर व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेत असलेले दोन ते तीन विद्यार्थी विक्री प्रतिनिधी म्हणून कार्यरत राहणार आहे. प्रत्येक स्टॉलवर उपलब्ध उत्पादनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली असून फेस्टीवलमध्ये ते ग्राहकांची संवाद साधणार असल्याने त्यांना नाविन्यपूर्ण अनुभव मिळणार आहे.

आगळावेगळा अनुभव – साक्षी वाणी
गेल्या दोन प्रर्दशनात आम्हाला प्रत्यक्षात उत्पादन खरेदी, विक्री काय असते, ग्राहकांच्या आवडी-निवडी याची माहिती झाली. ग्राहकांशी संवाद कसा साधावा याचे तंत्र कळले. उत्पादन वाढीसाठी कसे प्रयत्न करावे लागतात हे आम्ही पुस्तकात वाचले होते परंतु प्रत्यक्षात त्यासाठी काय करावे लागते याचा अनुभव आम्हाला आला. आमच्यासाठी हा एक आगळावेगळा अनुभव होता.

इतरांना प्रेरणा दिली – निधी खिंवसरा

आमच्या मागील अनुभवात आम्ही अगोदर उत्पादनांची माहिती घेतली. ग्राहकांना त्याबाबत कल्पना दिली त्यावरून ग्राहकांची रूची आम्हाला कळाली. एखाद्या उत्पादनाचे फ्री सॅम्पल आणि व्हिजीटींग कार्ड असल्यास उत्पन्न आणि विक्रीत वाढ होते हे शिकायला मिळाले. आम्हाला या उपक्रमातून प्रेरणा मिळाल्याने आम्ही इतरांना देखील याबाबत सांगितले.

हिशोबाचा ताळेबंद समजला – राज जैन

ग्राहकांचे समाधान करणे फार महत्त्वाचे असते. ग्राहक कसे जोडवे हे महोत्सवात आम्हाला कळले. ग्राहकांना आकर्षित करणे. माल तपासणे, त्याचा हिशोब ठेवणे, जमा खर्चाचा ताळेबंद तयार करणे हे सर्व ज्ञान आम्हाला प्रदर्शनात मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.