समीर वानखेडेंबाबत मोठा दावा; NCB अधिकाऱ्याचं खळबळजनक निनावी पत्र

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  

क्रूझ ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या कायद्याच्या घेऱ्यात असून या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. या प्रकरणामुळे सर्वात जास्त चर्चेत आलेले समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.  एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना एक निनावी पत्रं पाठवलं आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधातील हे पत्रं आहे. या पत्रात वानखेडेंनी केलेल्या 26 फ्रॉड केसेसचा उल्लेख करण्यात आला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतही त्याची माहिती दिली आहे.

या पत्रात नेमकं काय?

मी एनसीबीचा एक कर्मचारी आहे. गेल्या दोन वर्षापासून एनसीबीच्या कार्यालयात कार्यरत आहे. गेल्या वर्षी एनसीबीला सुशांत सिंह राजपूत प्रकणाच्या ड्रग्ज अँगलची चौकशी सोपवण्यात आली. महानिदेशक राकेश अस्थाना यांनी एसआयटीची स्थापना केली. त्यांनी त्यांचे शिष्य कमल प्रीत सिंह मल्होत्रा यांना एसआयटीचे प्रभारी बनवून मुंबईतील या ड्रग्ज अँगलची चौकशी सोपवली. त्यांच्यासोबत समीर वानखेडे होते. वानखेडे हे डीआरआयमध्ये काम करत होते. गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून आऊट ऑफ वे डीआरआयहून लोन बेसिसवर एनसीबी मुंबईत झोनल डायरेक्टर म्हणून वानखेडेंची नियुक्ती केली. राकेश अस्थाना हे किती प्रामाणिक अधिकारी आहेत हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी वानखेडे, केपीएस मल्होत्रांना साम, दाम, दंड आणि इतर कोणत्याही प्रकारे बॉलिवूडच्या कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात अडकवून केसेस बनविण्याचे आदेश दिले. दोघांनीही अस्थानांच्या इच्छापूर्तीसाठी काम केलं.

त्यांनी बॉलिवूडच्या कलाकारांच्या खोट्या केसेस बनविण्याचे काम केले. केस रजिस्टर करून मल्होत्रा आणि वानखेडेंनी बॉलिवूड कलाकारांकडून कोट्यावधी रुपये उकळले. त्याचा हिस्सा अस्थानांना दिला. दीपिका पदुकोण, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकूल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिम्बिया, रिया चक्रवर्ती, सोविक चक्रवर्ती, अर्जून रामपाल या कलाकारांचा यात समावेश आहे. त्यांचे वकील अयाज खानने ही संपूर्ण रक्कम गोळा केली. अयाज खान आणि समीर वानखेडे हे मित्र असून अयाज कधीही वानखेडेंच्या कार्यलयात येऊ शकतो. तो वानखेडेंना बॉलिवूडकडून दरमहा हप्ते वसुली करून देतो. वानखेडेही कोणत्याही बॉलिवूडच्या कलाकारांना पकडतात आणि अयाज खानला आपला वकील करायला सांगतात, असं या निनावी पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

वानखेडे प्रसिद्धी लोलूप

समीर वानखेडे हे प्रसिद्धी लोलूप अधिकारी आहेत. त्यांना सतत बातम्यांमध्ये राहायला आवडतं. त्यासाठी ते निर्दोष लोकांना एनडीपीएस केसेसमध्ये अडकवतात. खोट्या केसेस तयार करण्यासाठी त्याने आपली वेगळी टीम तयार केली आहे. त्यात अधीक्षक विश्व विजय सिंह, आयओएस आशिष रंजन, सूरज, ड्रायव्हर विजय, अनिल माने आणि वानखेडेंचा खाजगी सचिव शरद कुमार यांचा समावेश आहे. ओटीसी कदम, शिपाई रेड्डी, पीडी मोरे, विष्णू मीना, ड्रायव्हर अनिल माने हे सर्व लोक कोणाच्याही घरी झडती घेताना ड्रग्ज ठेवतात. त्यानंतर खोट्या केसेस तयार करतात. एखाद्याच्या घरी कमी प्रमाणात ड्रग्ज सापडल्यास ड्रग्जचं प्रमाणही अधिक दाखवतात.

तसेच एनसीबीच्याच कार्यालयात पंचनामा केला जातो. समीर वानखेडे काही लोकांकडून ड्रग्ज खरेदी करतो. नंतर खोट्या केसेस बनवतात. दशरथ, जमील, अफजल, मोहम्मद शेख, नासिर, आदिल उसमानी ही ती लोकं आहेत. ही लोकं केवळ समीर वानखेडेंना ड्रग्ज आणून देतात. हे ड्रग्ज खरेदी करण्यासाठी वानखेडे सिक्रेट सर्व्हिस फंड आणि लोकांच्या घरी छापेमारी करताना सापडलेल्या पैशाचा वापर करतात. मी खाली काही केसेस मांडत आहे. त्यातून वानखेडेंनी कशा खोट्या केसेस बनवून लोकांना फसवले हे स्पष्ट होईल, असं या पत्रात म्हटलं आहे.

मलिकांनी जाहीर केलेली  26 प्रकरणं 

1. केस नंबर 16/2020मध्ये सुरुवातीला करण अरोडा, जैद विलत्रा आणि अबास लखानीला पकडण्यात आलं. त्यांच्याकडे अत्यंत कमी प्रमाणात गांजा सापडला. त्यावेळी समीर वानखेडे एनसीबीमध्ये नुकतेच दाखल झाले होते. दिनेश चव्हाण हे सुपरिटेंडंट ऑपरेशन्सचा कार्यभार सांभाळत होते. विश्व विजय सिंह सुपरिटेंडन्ट अॅडमिनिस्ट्रेशनची सूत्रे सांभाळत होते. समीर वानखेडे यांनी दिनेश चव्हाणला करण अरोडा, जैद विलत्रा आणि अबास लखानीच्या कबुली जबाबात रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा आदींचे नावे टाकण्यास सांगितले. त्याला दिनेश चव्हाण यांनी नकार दिला. त्यानंतर समीर वानखेडेंनी चव्हाण यांना या ऑपरेशनमधून कार्यमुक्त केले. त्यानंतर विश्व विजय सिंह यांच्याकडे ऑपरेशन्सचा कार्यभार दिला. तेव्हापासून आतापर्यंत विश्व विजय सिंह हे समीर वानखेडेंच्या हातचं बाहुले बनले आहेत. या दोघांनी मिळून एनडीपीएसच्या कलम 27 अ चा दुरुपयोग करून निरापराध लोकांना फसवले. समीर वानखेडे सांगतात तसेच विश्व विजय करत असतात. समीर वानखेडे आणि विश्व विजय सिंह यांच्या विरोधात एनसीबी कार्यालयात अनेक तक्रारी आल्या आहेत. मात्र, या तक्रारी खोट्या असल्याचं सांगून त्यांनी फेटाळल्या आहेत. केस नंबर 16/2020मध्ये विश्व विजय सिंहने मोहम्मद जुम्मनकडून 20-25 लाख रुपये घेतले आहेत. त्याने एनसीबी कार्यालयात लिखित तक्रार दिली आहे. परंतु वानखेडेंनी हे आरोप चुकीचे असल्याचं सांगून केस बंद केली आहे.

2. केस नंबर 03/2021मध्ये समीर वानखेडेंनी खोट्या प्रकरणात अटक करून 200 किलो तंबाखूला गांजा दाखवून खोट्या पद्धतीने केस तयार केली. आर्थिक व्यवहाराचा आरोप करून एनडीपीएसच्या कलम 27अ चा दुरुपयोग केला.

3. केस नंबर 06/2021मध्ये मोहम्मद नजीम खानच्या घरी आशिष रंजन आयओने 61 ग्रॅम मेफेड्रोन ठेवून खोटी केस तयार केली. त्याला तुरुंगात टाकलं.

4. केस नंबर 09/2021 मध्ये मोहम्मद बिलालला 136 ग्रॅम मेफेड्रोन ठेवून खोटी केस तयार केली. त्यालाही तुरुंगात टाकलं.

5. केस नंबर 18/2021मध्ये अमजद असलं शेखच्या घरी आशिष रंजन आयोने 64 ग्रॅम मेफेड्रोन ठेवून खोटी केस तयार केली. त्यालाही तुरुंगात टाकलं.

6. केस नंबर 24/2021मध्ये शाहबाद बटलाच्या घरी शिपाई पीडी मोरेंनी समीर यांच्या सांगण्यावरून ड्रग सप्लायर आदिल उसमानीकडून 60 ग्रॅम मेफेड्रोन खरेदी करून त्याच्याच घरी ते ठेवून खोटी केस बनवली. त्यालाही तुरुंगात टाकलं.

7. केस नंबर 27/2021मध्ये अब्दुल काबीर आणि नजिया शेखच्या घरी 52 आणि 54 ग्रॅम मेफेड्रोन ठेवून खोटी केस तयार केली. त्याला तुरुंगात डांबण्यात आलं.

8. केस नंबर 28/2021मध्ये इमरानच्या घरी आशिष रंजन आयओने 57 ग्रॅम मेफेड्रोन ठेवून केस बनवून त्याला तुरुंगात टाकलं.

9. केस नंबर 29/2021मध्ये केन्निथच्या घरी 200 ग्रॅम मेफेड्रोन ठेवून खोटी केस तयार करण्यात आली. त्यालाही तुरुंगात टाकलं.

10. केस नंबर 30/2021मध्ये अन्सारी समीरुद्दीनच्या घरी 55 ग्रॅम मेफेड्रोन ठेवून केस तयार करण्यात आली. त्याला तुरुंगात टाकण्यात आलं.

11. केस नंबर 31/2021मध्ये चिकुडी पीटर, नायजेरियन व्यक्तिकडे 22 ग्रॅम कोकेन आणि 260 ग्रॅम चरस सापडली म्हणून खोटी केस बनवली. त्यालाही तुरुंगात टाकण्यात आलं.

12. केस नंबर 32/2021मध्ये अब्दुल गफ्फार कुरेशीच्या घरी 52 ग्रॅम मेफेड्रोन ठेवून खोटी केस बनवली. त्यालाही तुरुंगात टाकलं.

13. केस नंबर 33/2021मध्ये शोयन हैदर खानच्या घरी 1.2 ग्रॅम मेफेड्रोन आणि 17 ब्लॉट्स एलएसडी ठेवून खोटी केस तयार केली. त्याच्या घरून 17 लाखाची रोकड सापडली. एनसीबी टीमने समीर वानखेडेंच्या सांगण्यावरून 9 लाख रुपये सापडल्याचं दाखवून उरलेली रक्कम आपसात वाटून घेतली.

14. केस नंबर 40/2021मध्ये समीर सुलेमान सना आणि सर्फराश कुरेशीला आशिष रंजन आयओ, विश्व विजय सिंह यांनी आरोपींच्या घरी 50 व 60 ग्रॅम मेफेड्रोन ठेवून खोटी केस तयार केली. त्यालाही तुरुंगात टाकण्यात आलं. त्याच्या घरातून 25 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने गायब केले. तक्रार झाल्यावर समीर वानखेडेंनी हे संपूर्ण प्रकरण मार्गी लावलं.

15. केस नंबर 44/2021मध्ये सिकंदर हुसैन सजादच्या घरातून 12 बॉटल कोडीनच्या खोकल्याचा सिरप आणि काही प्रमाणात गांजा व मेफेड्रोन सापडले. परंतु शिपाई विष्णू मीनाने वानखेडेंच्या सांगण्यावरून दोन कार्टुन कोडीनच्या खोकल्याचे सीरप त्याच्या घरी ठेवून खोटी केस तयार केली. त्यालाही तुरुंगात टाकले. त्याच्या बहिणीकडे शिपाई विष्णू मीना हातात दोन कार्टून घेऊन जातानाचा व्हिडीओही आहे. त्यांचं म्हणणं कोणीही ऐकून घेत नाही.

16. केस नंबर 49/2021 मध्ये अहसान सजाद खानच्या घरी 62 ग्रॅम मेफेड्रोन ठेवून खोटी केस तयार केली. त्यालाही तुरुंगात टाकलं.

17. केस नंबर 51/2021मध्ये सोहेल शेखच्या घरी 62 ग्रॅम मेफेड्रोन ठेवून खोटी केस तयार करण्यात आली. त्यालाही तुरुंगात टाकण्यात आलं.

18. केस नंबर 60/2012मध्ये फाहद सलीम कुरेशीच्या घरी 60 ग्रॅम मेफेड्रोन ठेवून खोटी केस तयार त्याला तुरुंगात टाकलं.

19. केस नंबर 63/2021मध्ये मोहम्मद अशील शेखच्या घरी 57 ग्रॅम मेफेड्रोन ठेवून खोटी केस तयार करण्यात आली. त्याला तुरुंगात टाकलं.

20. केस नंबर 71/2021मध्ये समीर मुख्तार सायदच्या घरी 200 ग्रॅम चरस सापडला. मात्र समीर वानखेडेंच्या सांगण्यावरून 1200 ग्रॅम चरस सापडल्याची खोटी केस तयार केली. त्यालाही तुरुंगात टाकलं.

21. केस नंबर 77/2021मध्ये एका नायजेरियन व्यक्तिला मानखुर्दमध्ये पकडलं. त्याच्याकडे ड्रग्ज मिळाले नाही. मात्र, समीर वानखेडेने त्याच्याकडून 254 ग्रॅम हेरोईन आणि 7.5 ग्रॅम कोकेन सापडल्याची खोटी केस बनवली. त्यालाही तुरुंगात टाकलं.

22. केस नंबर 80/2021मध्ये एका नायजेरियन व्यक्तिला खारघरला पकडलं होतं. त्याच्याकडे ड्रग्ज सापडलं नाही. मात्र, समीर वानखेडेंनी त्याच्याकडे 60 ग्रॅम मेफेड्रोन सापडल्याची खोटी केस बनवून त्याला तुरुंगात टाकलं.

23. केस नंबर 94/2021मध्ये एका व्यक्तिला अटक करण्यात आली. त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. सीजरच्यावेळी त्याचं डेबिट कार्ड जप्त करण्यात आलं. गुजरातच्या एका बँकेचं हे कार्ड होतं. त्याचा पीआयएन नंबर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता. समीर वानखेडेंच्या सांगण्यानुसार, त्या व्यक्तिला तुरुंगात टाकल्यानंतर त्याच्या डेबिट कार्डावरून 40 हजार रुपये काढण्यात आले.

24. केस नंबर 94/2021ची केस ही कोर्डिला क्रुझची आहे. त्याचे सर्व पंचनामे एनसीबीच्या कार्यालयात करण्यात आले. भाजपच्या इशाऱ्यावर त्यांच्या दोन कार्यकर्त्यांनी समीर वानखेडेशी संगनमत करून ड्रग्ज प्लांट केला. क्रुझवर एनसीबीचे कर्मचारी, सुपरिटेन्डंट विश्व विजय सिंह, आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी, जीआयओ सुधाकर शिंदे, ओटीसी कदम, शिपाई रेडीड, पी. डी. मोरे, विष्णू मीना, ड्रायव्हर अनिल माने आणि समीर वानखेडे यांचे खाजगी सचिव शरद कुमार आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सामानातून लपून ड्रग्ज नेले होते. संधी साधून हे ड्रग्ज क्रुझवरील लोकांच्या सामानांमध्ये ठेवण्यात आले होते. समीर वानखेडेंना सर्च किंवा ऑपरेशनच्या वेळी एखादा बॉलिवूड कलाकार किंवा मॉडल किंवा सेलिब्रिटी हवा असतो. त्यासाठी ते जबरदस्ती ड्रग्ज ठेवून केस तयार करतात. या प्रकरणातही तेच झाले. समीर वानखेडे गेल्या एक महिन्यांपासून भाजपच्या या दोन्ही कार्यकर्त्यांच्या (केपी गोसावी आणि मनिष भानुशाली) संपर्कात होते. क्रुझवर जेवढे लोकं पकडली गेली त्यात सर्वांना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आले. सर्व पंचनामे एनसीबीच्या कार्यालयात बसून करण्यात आले. परंतु, ऋषभ सचदेव, प्रतिक गाबा आणि अमीर फर्निचरवालाला त्याच रात्री दिल्लीहून फोन आल्यानंतर सोडून देण्यात आलं. या प्रकरणी समीर वानखेडेंचे फोन कॉल्स डिटेल्स चेक केले जाऊ शकतात. या प्रकरणात अरबाज मर्चंटचा मित्र अब्दुलकडे ड्रग्ज सापडले नाही. मात्र वानखेडेंच्या सांगण्यावरून ड्रग्ज मिळाल्याचं दाखवण्यात आलं. समीर वानखेडेंनी याप्रकरणात एनसीबी कार्यालयाचे ड्रायव्हर विजय यांना पंच म्हणून दाखवलं. कायद्यानुसार पंच हा स्वतंत्र असायला हवा. हे संपूर्ण प्रकरण खोटं असून वानखेडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ते प्लांट केलं आहे.

25. एनसीबी गोवाने शिपाई रेड्डीच्या माध्यमातून प्रसाद वादकेच्या घरी 17 ग्रॅम एलएसडी ठेवून खोटी केस बनवली आणि त्याला तुरुंगात टाकलं.

26. बिग बॉसमध्ये भाग घेणारे अरमान कोहलीच्या घरी शिपाई विष्णू मीना आणि रेड्डीने 1 ग्रॅम कोकेन ठेवून त्याच्यावर खोटी केस तयार केली. त्यालाही तुरुंगात पाठवलं.

मदत न करणाऱ्यांना निलंबित केलं

वानखेडेंनी एनसीबी मुंबईची सूत्रे हाती घेतल्यापासून तेव्हापासून आतापर्यंतच्या केसेसमध्ये अटक करण्यात आलेल्या लोकांडून 25 कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या आहेत. आपल्या मनाने पचंनामे बदलले जात आहेत. कोऱ्या कागदांवर सह्या असलेले अनेक कागद एनसीबी अधिकाऱ्यांच्या टेबलच्या खणात आहेत. काही कागद विश्व विजय सिंह यांच्या कपाटात आहेत. त्यावर धाडी मारून ते जप्त केले जाऊ शकतात. त्याशिवाय समीर वानखेडे आणि विश्व विजय सिंह यांच्या केबिनमधून काही प्रमाणात ड्रग्जही मिळू शकते.  अशोक मुथा जैन यांना समीर वानखेडे दर महिन्याला मोठी रक्कम लाच म्हणून देत आहेत. त्यामुळे वानखेडे यांच्या चुकीच्या कामांवर पांघरून घातलं जात आहे. समीर आणि इतर अधिकाऱ्यांवर झालेल्या तक्रारीतून त्यांच्या बचाव केला जात आहे. जे लोक चुकीच्या कामांमध्ये साथ देत नाहीत त्यांना सस्पेंड केलं जात आहे. वानखेडेंनी आतापर्यंत चार प्रामाणिक अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचंही या निनावी पत्रात म्हटलं आहे.

चौकशीसाठी आयोग नेमावा

या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. या प्रकरणात आतापर्यंत ज्या लोकांना अटक करण्यात आली आहे त्यांची चौकशी करावी. त्यामुळे सत्य बाहेर येईल. वानखेडे खोट्या केसेस बनवत असल्याचं त्यातून दिसून येईल. महाराष्ट्र सरकारने याची दखल घेऊन चौकशी आयोगाची नियुक्ती करून या प्रकरणाची चौकशी करावी. जेणेकरून दूध का दूध आणि पानी का पानी होईल. तसेच दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा होईल. मी माझं नाव उघड करू शकत नाही. कारण मी एनसीबीमध्ये कार्यरत आहे. माझं नाव उघड केल्यास मला धोका होऊ शकतो, असंही या पत्रात म्हटलं आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.