संजय राठोडांनी पहिल्यांदाच दिले राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले होते. या प्रकरणामुळे अडचणीत आलेले माजी वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. विधिमंडळाचे अधिवेशन तोंडावर विरोधकांनीहे प्रकरण उचलून धरले होते. त्यातच उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता संजय राठोड यांनी राजीनामा देण्याबाबत पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे.

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. त्यानंतर आता ‘मी एका प्रकरणादरम्यान राजीनामा दिला आहे, आता परत मला मंत्रीपद द्यायचं की नाही हा संपूर्ण निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आहे, मात्र मी माझ्या समाजासाठी काम करत राहणार’ असे माजी मंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे.

सोलापूर येथे आयोजित केलेल्या सभेमध्ये संजय राठोड बोलत होते. ‘मी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. जेव्हा आरोप झाले अधिवेशन चालू देणार नाही असे म्हटले गेले. मी त्या पक्षात आहे. नेते म्हणून उद्धव ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ काम करणारे म्हणून आहे. मन लावून ते प्रामाणिकपणे एकनिष्ठेने काम करत आहेत. त्यामुळे मला वाटलं आरोप झाले जे काही होऊल ते पाहू. मी बाजूला राहतो करा तुम्ही चौकशी,’ असे संजय राठोड यांनी म्हटले आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतरच राजीनामा स्वीकारण्याची विनंती राठोड यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा झाली. वर्षा निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.