शेतकरी विकास पॅनलच्या मोटारगाडीचे चाक निखळले

0

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलचा प्रयोग फसल्यानंतर भाजपने सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीचा निषेध म्हणून निवडणुकीवर बहिष्कार टाकला. भाजपच्या सर्व उमेदवारांचे आ.गिरीश महाजनांसकट अर्ज माघार घेतले. निवडणूक लढली असती तर हात दाखवून अवलक्षण होऊ नये, झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणून भाजपला हा निर्णय घ्यावा लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीने काँग्रेसचा पोपट केला असला तरी महाविकास आघाडीची साथ काँग्रेसला सोडणे परवडणारे नव्हते म्हणून काँग्रेस महाविकास आघाडीच्या पॅनलसोबत राहिली.

काँग्रेसचे काही असंतुष्ट नेते मंडळी विशेषत: शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व करणारे काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव धरणगावचे डी.जी. पाटील यांनी पक्षातील दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची ओरड करीत असतील तर ते नेतृत्व विरोधातील त्यांचे वैयक्तिक मत झाले. त्यामुळे त्यांच्या ओरडण्याची दखल पक्षाकडून घेतली जाणार नाही. व्यक्तीपेक्षा पक्ष हा मोठा असतो. हे डी.जी. पाटलांना नव्याने सांगण्याची गरज नाही. शेतकरी विकास पॅनलचे नि:स्वार्थ नेतृत्व डी.जी.पाटलांनी केले असते तर त्यांच्या शब्दाला किंमत मिळाली असती. स्वत:च्या पत्नी एकदा बँकेच्या संचालक होत्या. त्यांच्यासाठी पुन्हा आग्रह धरणे हे कदाचित काँग्रेस श्रेष्ठींना पटले नसेल म्हणून त्यांनी महाविकास आघाडीचा निर्णय मान्य केला असावा.

शेतकरी विकासच्या प्रचाराचा नारळ तरसोदच्या गणपती मंदिरात नारळ फोडला गेला. प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी डी.जी. पाटलांसह शेतकरी विकास पॅनलच्या पाचही उमेदवारांतर्फे आपआपल्या पक्षाच्या नेतृत्वावर जोरदार हल्लाबोल केला. तथापि प्रचार नारळ फोडल्याच्या दुसऱ्याच दिवशी शेतकरी विकास पॅनलमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकरिणीच्या सदस्या, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा कल्पना शांताराम पाटील यांनी महिला राखीव प्रवर्गामधील महाविकास आघाडीच्या उमेदवार बँकेच्या विद्यमान चेअरमन ॲड. रोहिणी खडसे खेवलकर यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. मी निवडणुकीतून माघार घेऊन माझा पाठिंबा ॲड. रोहिणी खडसे खेवलकर यांना असल्याचे पत्र खुद्द रोहिणी खडसेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्या सुपूर्द सादर केला. त्यामुळे शेतकरी विकास पॅनलच्या एकतेलाच सुरुंग लागला आहे.

शेतकरी विकास पॅनलमधील जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा समन्वयक विकास पवार हे तर शरद पवारांचे खंदे समर्थक आहेत. त्यामुळे शरद पवारांनी नुसते डोळे वटारले तरी विकास पवारांची स्थिती काय होईल हे सांगण्याची गरज नाही. जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती हे भाजपचे आहेत. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याने त्यांनी बंडखोरी कुणाविरुध्द केली हे कळायला मार्ग नाही. ते जरी भाजपात असले तरी भुसावळचे आमदार संजय सावकारेनी सुध्दा आपली उमेदवारी मागे न घेता ते निवडणूक लढवत आहे. कारण आ.संजय सावकारे भाजपचे अधिकृत आमदार असले तरी मनाने एकनाथराव खडसेंसोबत आहे हे सर्वश्रूत आहे. तीच अवस्था रविंद्र सुर्यभान पाटलांची असावी. त्यामुळे शेतकरी विकास पॅनलचा तूर्ततरी गेम फसल्याचे दिसून येते. येत्या काही दिवसात प्रत्यक्ष मतदानाच्या आधी यापैकी कायम किती टिकावा याच्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे कल्पना शांताराम पाटलांच्या माघारीमुळे त्यांच्या मोटारगाडी चिन्हाचे एक चाक निखळले आहे. बाकी तीन चाकावर गाडी कसे चालते ही कसरतच राहणार आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनेक गमती जमती पहायला मिळत आहेत. रावेर तालुका वि.का.सो.मतदार संघातून महाविकास आघाडी जनाबाई गोंडू महाजन यांना उमेदवारी दिली होती. पक्षाने कपबशीच्या चिन्हाचेंही वाटप झाले होते. तथापि दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार माजी आमदार अरूण पाटील यांना जाहीर पाठिंबा जनाबाई गोंडू महाजन यांना देत काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का दिला. अर्थात या पाठिंब्यांमागे त्यांचे काही तरी आर्थिक गणित असेल हे सांगता येत नाही. परंतु पक्षश्रेष्ठींनी काही न विचारता त्यांनी राष्ट्रवादी बंडखोर उमेदवार अरूण पाटलांना पाठिंबा दिला.

अरूण पाटलांनी बंडखोरी करून उमेदवारी कायम ठेवताच अरुण पाटील भाजपा प्रवेश करणार अशा भाजपतर्फे वावड्या उठवल्या होत्या. त्यांच्या वावड्या हवेतच विरल्या अरूण पाटील हे राष्ट्रवादी सोडणार नाही. उलट जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष काँग्रेसचे माजी प्रभारी जिल्हाध्यक्ष राजीव रघुनाथ पाटील यांनी आपला पाठिंबा पाटलांना असल्याचे पत्रकार परिषद घेवून जाहीर केल्यामुळे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार व काँग्रेस बंडखोर उमेदवार यांनी अरूण पाटलांना पाठिंबा दिल्याने निवडणूक होणार असली तरी अरूण पाटील बिनविरोध निवडून येतील ही काळ्या दगड्यावरची रेख आहे. एवढे मात्र निश्चित! यामुळे राष्ट्रवादीचा फायदा झाला.  आणि भाजपचे मात्र स्वप्न भंगले.

Leave A Reply

Your email address will not be published.