शहरातील चौपदरीकरणाचे त्रांगडे कायम…!

0

जळगाव शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या मालिकांमुळे विशेष म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चौपदरीकरणास मंजुरी दिली. या महामार्गावर गुजराल पेट्रोल पंप, शिवकॉलनी, अग्रवाल चौक, प्रभात कॉलनी चौक, आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौफुली येथे महामार्गाला क्रॉसिंग करून जळगावकर पायी, सायकल, मोटारसायकल, कार आदिद्वारे जा-ये करतात.

झपाट्याने वाढणाऱ्या जळगाव शहराची लोकसंख्या वाढणाऱ्या कॉलन्यांमुळे वरील ठिकाणी क्रॉसिंग अत्यंत धोकादायक आहे. त्यासाठी महामार्गाचे चौपदरीकरण आणि समांतर रस्ते व्हावेत म्हणून गेल्या दोन दशकांपासून जळगावकरांची मागणी होत आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलने झाली. परिणामस्वरूप महामार्ग क्र. 6 चे चौपदरीकरण होत असतांना शहराबाहेरून  बायपास करण्यात आले. तथा खोटेनगर ते कालिंका माता मंदिरापर्यंतची वहातूक लक्षात घेता अपघातात अनेक लोकांचे निष्पाप बळी गेले. भविष्यात अपघात होऊ नये म्हणून जळगाव बाहेरून महामार्ग काढला असतानासुध्दा जळगावकरांच्या सुरक्षीतेसाठी विशेष बाब म्हणून महामार्गाचे चौपदरीकरणास मंजुरी दिली.

खोटेनगर ते कालिंका माता मंदिरापर्यंतच्या चौपदरीकरणाचा जो डीपीआर मंजूर झाला तो मात्र जनतेपासून गुलदस्त्यात ठेवण्यात आला. महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा (नहीचा) हा प्रताप होय. डीपीआर सार्वजनिक न करण्याचे कारण मात्र कळायला मार्ग नाही. त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. तेव्हा या चौपदरीकरणातील सदोषपणा दिसून आला. गुजराल पेट्रोल पंपाजवळ होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन तेथे उड्डाण पूल झाला हे ठिक आहे. त्यानंतर कॉलनीच्या क्रॉसिंगला होणाऱ्या वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात याची मात्र दखल घेतली नाही. भविष्यात येथे अपघाताची मालिका वाढणारच आहे. त्यानंतर अग्रवाल चौकात छोटासा अंडरपास केला गेला. तो सदोष असल्याचे जागृक जनतेने सप्रमाण नहीच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर दुसरा एक अंडरपास करण्यात आला. त्यानंतर प्रभात कॉलनी चौकातील उड्डाण पुलाबाबतही बरीच चर्चा झाली.परंतु त्यापुढे आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौफुली येथे फार मोठ्या प्रमाणात वहातूक कोंडी होते आणि सातत्याने अपघात होतात. या तिन चौकांमध्ये उड्डाणपूल होणे भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे पण नहीच्या अधिकाऱ्यांनी आकाशवाणी चौकात रोटरी सर्कलचे काम सुरु केले आहे ते अंत्यंत सदोष आहे. तेथे उड्डाण पूलच हवे अशी मागणी आहे.

जळगाव शहरातील काही प्रतिष्ठीत व्यापारी मंडळीनी नुकतीची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यांना शहरातील या महामार्ग चौपदरी करणासंदर्भात माहिती दिली. या महामार्गावर आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौफुली येथे उड्डाणपूल झाले तरच वाहतुकीची कोंडी होणार नाही आणि अपघातसुध्दा होणार नाही. त्यासाठी जळगावकरांच्या वतीने या व्यापारी मंडळींनी लेखी निवेदन देवून या तीन चौकात उड्डाण पूल करावेत असे साकडे घातले आहे. हे काम खरे तर नहीच्या अधिकाऱ्यांनी गडकरी मंत्री महोदयांच्या लक्षात आणून द्यायला हवे होते. पण नहीचे अधिकाऱ्यांना त्याबाबत काही देणे – घेणे – नाही. अग्रवाल चौकातील अंडरपास सदोष आहे. हे दाखवून दिल्यानंतर जळगावकरांचा दबाव वाढला आणि त्या दबावापोटी तेथे दुसरा अंडरपास करण्यात आला.

नहीचे अधिकारी कंत्राटदरांचे नोकर आहेत की शासनाचे असा आरोप खुद्द जळगाव जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनी आढावा बैठकीत केला होता. त्यामुळे नहीच्या अधिकाऱ्यांचा बेजाबदारपणा आणि अकार्यक्षमता चव्हाट्यावर आणून या तिन्ही चौकात उड्डाण पूल बांधलेच गेले पाहिजेत. अन्यथा जळगावकर पुन्हा आंदोलनाच्या रुपाने रस्त्यावरच उतरतील यात शंका नाही. तुम्ही कामे घेवून या आणि मंजूर करून घ्या. तेव्हा नहीच्या अधिकाऱ्यांचे काय जाते. नव्याने डीपीआर मंजूर करून घेण्याची त्यांची जबाबदारी आहे. परिस्थितीनुसार काही कामात बद्दल करणे आवश्यक आणि अपरिहार्य असेल तर मंत्री महोदयाकडे नवीन प्लान सादर करणे गरजेचे आहे. त्यामुळे जळगाव शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणात त्रुटी राहू नये म्हणून भविष्याच्या दृष्टीने जळगावकरांच्या सुरक्षिततेसाठी आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक आणि अजिंठा चौफुली येथे उड्डाण पूल झालेच पाहिजेत.

Leave A Reply

Your email address will not be published.