कडधान्य खरेदीत तब्बल पावणेचार कोटींची फसवणूक; चौघे अटकेत

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्ह्यातील व्यापार्‍यांची कडधान्य खरेदीत तब्बल पावणेचार कोटी रूपयात फसवणूक करणार्‍या चौघांना सायबर सेल शाखेने अटक केली आहे.

पिंप्री (ता. धरणगाव) येथील जागेश्वरी जिनिंग ऍन्ड प्रेसिंगचे मालक प्रतिक राजेश भाटिया यांच्याकडून नील ट्रेडर्सचे राहुल कांतीलाल लुणावत (रा. नाशिक), सुमीत एजन्सीचे सुमीत राजेंद्र लुणावत (रा. मनमाड), शुभम ट्रेडिंगचे शुभम राजेंद्र लुणावत (रा. मनमाड) व दिनेश कांतीलाल लुणावत (रा. मनमाड) या चौघा व्यापार्‍यांनी सन २०१९ पासून धान्य खरेदी केले होते. याचे पैसेही त्यांनी भाटिया यांना वेळेत देऊन त्या आधारे विश्वास संपादन केला. यानंतर १२ डिसेंबर २०१९ ते १० डिसेबर २०२० दरम्यान दिनेश लुणावत याच्यासह इतरांनी ३ कोटी ७५ लाखांवर कडधान्य खरेदी केले होते. यानंतर मात्र त्यांनी याचे पैसे देण्यास टाळाटाळ केली.

यामुळे राजेश भाटिया यांची पावणेचार कोटी रुपयांनी आर्थिक फसवणूक झाली. या प्रकरणी भाटिया यांच्या फिर्यादीवरून १७ जून २०२१ रोजी धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिसांनी केला. चौघाही संशयितांना सायबर पोलिसांनी २६ जून रोजी सीआरपीसी कलम ४ (१) नुसार नोटीस देवून त्यांचे म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. ३१ जून रोजी चौघेही व्यापारी सायबर पोलिस ठाण्यात आले होते. त्यांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदतवाढ मागितली. त्यानंतर शुक्रवारी ते म्हणणे सादर करण्यासाठी सायबर पोलिस ठाण्यात आले होते. मात्र ते याचे सबळ कागदोपत्री पुरावे सादर करू शकले नाहीत. यामुळे नील ट्रेडर्सचे राहुल कांतीलाल लुणावत (रा. नाशिक), सुमीत एजन्सीचे सुमीत राजेंद्र लुणावत (रा. मनमाड), शुभम ट्रेडिंगचे शुभम राजेंद्र लुणावत (रा. मनमाड) व दिनेश कांतीलाल लुणावत (रा. मनमाड) या चौघा व्यापार्‍यांना सायबर पोलिसांनी तात्काळ अटक केली.

सदर  प्रकरणी पुढील तपास सायबर शाखेचे निरिक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. दरम्यान, याच व्यापार्‍यांनी जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील व्यापार्‍यांची खरेदीत फसवणूक केलेल्यांची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलीस या दिशेने तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.