वाहने जाळल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, दोघांना अटक

0

तीन संशयित पसार

भुसावळ :- पैशांच्या वादातून इनोव्हा कार पेटवून दिल्याची घटना शहरातील अकबर टॉकीज परिसरात ४ जुलै रोजी घडली होती. या घटनेत कारशेजारील जिप्सी व दोन दुचाकी जळून खाक झाल्याने, दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी शहर पेालिस ठाण्यात सोमवारी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यापैकी दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली.

किराणा व्यावसायीक ईलियासअली अब्बास अली यांचे रेहान पटेल, दीपक परदेशी यांच्याशी आर्थिक विषयावरुन वाद सुरू होते. गुरूवारी पहाटे संशयितांनी चार वाहने जाळली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर मुख्य संशयीत पसार झाले होते.

तर या गुन्ह्यात विनय राजू गाढे ( रा.द्वारकानगर, भुसावळ) व मिलवीन विल्यम अँथोनी (रा.मरीमाता मंदिराजवळ, भुसावळ) यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. तर एका अनोळखीसह एकूण अन्य तीन संशयित पसार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे. भुसावळ शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार साहिल तडवी व हवालदार सुपडा पाटील यांनी संशयितांना अटक केली.

सीसीटीव्हीमुळे झाला घटनेचा उलगडा 

या प्रकरणात पोलिसांनी फिर्यादीच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. फिर्यादीने दोन जणांवर संशय व्यक्त केला होता. मात्र सीसीटीव्हीत पाच जण आढळून आले. वाहन पेटवताना संशयीत विनय गाढे हा भाजल्याने त्याने घटनेच्या दिवशी उपचार घेतल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. संबंधित डॉक्टरांकडून माहिती घेतल्यानंतर संशयितांनी पोलिसांनी अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.