लोकसभेची रणनीती ठरविण्यासाठी मुख्यमंत्री आज ‘मातोश्री’वर

0

मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेणार आहेत. शिवसेना-भाजप मध्ये युती झाली असली तरी बऱ्याच मतदारसंघांमध्ये छोटे-मोठे वाद सुरु आहे. या वादांवर पडदा टाकण्यासाठी तसेच लोकसभेची एकत्रित रणनीती ठरविण्यासाठी ही भेट होणार असल्याचे कळते.

जालन्यातील लोकसभेच्या जागेबाबत रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात वाद सुरु असून ‘मातोश्री’वरील भेटीत या वादावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे कळते. या लोकसभा मतदारसंघाबरोबरच आणखी काही ठिकाणी वाद असलेल्या मतदारसंघांमध्ये अदलाबदल करता येईल का, याविषयी या भेटीत चर्चा होणार असल्याचे कळते. लोकसभा निवडणुकांसाठी काय रणनीती असावी यावर देखील या भेटीत चर्चा होणार असल्याचे समजते. आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागणार असल्याने त्यापूर्वी विविध प्रश्नांवर निर्णय घेण्याबाबतही या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान बुधवारी दिवसभर मुख्यमंत्र्यांचे नागपूरमध्ये कार्यक्रम असल्याने त्यांनी नागपूरमध्येच मुक्काम केला. आज, गुरुवारी दुपारनंतर ते मुंबईत परतणार असून त्यानंतर मातोश्रीवरचा कार्यक्रम निश्चित होणार असल्याचे कळते. बुधवारी रात्रीपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री कार्यक्रमाबाबत अधिकृत कोणतीही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडे उपलब्ध नव्हती.

Leave A Reply

Your email address will not be published.