हंदवाडा चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

0

श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या हंडवाऱ्याजवळ क्रालगुंड गावात रात्रीपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दरम्यान याच भागात आणखीन एक दहशतवादी अजूनही लपून बसल्याची शंका असून शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

या भागात बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास सैन्याच्या पथकावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली. गुरुवारी सकाळपर्यंत परिसरात शोधमोहीम राबवली जात होती. पहाटे सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नसून चकमकीच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

दरम्यान, चार दिवसांपूर्वीही हंदवाडा येथे चकमक झाली होती. ७२ तास ही चकमक सुरु होती. या चकमकीत सुरक्षा दलांनी २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तर पाच जवानही या चकमकीत शहीद झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.