लग्नसोहळ्यातही राजकारण…!

0

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे  पाणीपुरवठामंत्री शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव विक्रमचा विवाह काल पाळधी येथे साईबाबा मंदिराच्या परिसरात थाटात संपन्न झाला. काल गोरज मुहुर्तावर पार पडलेल्या या लग्नसोहळ्याला जळगाव जिल्हाभरातून गुलाबराव पाटलांच्या चहात्यांची मोठी गर्दी झाली होती. जळगाव तालुका आणि धरणगाव तालुक्यातील लहान – थोर, पुरूषांनी मोठ्या संख्येने लग्नाला हजेरी लावलेली होती. लग्न गोरज मुहूर्तावरचे असले तरी सकाळपासून जळगाव व धरणगाव तालुक्यातील गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघातील जनतेसाठी जेवणावळी सुरू होती. संध्याकाळी लग्न लागेपर्यंत आणि लग्न लागल्यानंतर सुध्दा जेवणावळीच्या पंगती उठत होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात लग्नसोहळ्यात जेवणावळीच्या पंगती अगदी शांतपणे चालल्या होत्या. गुलाबरावांच्या कार्यकर्त्यांनी मनापासून पंगती जेवण वाढण्याचे कार्य करीत होते. ही भव्य जेवणावळी पाहिल्यानंतर गुलाबराव पाटलांनी पुढील विधानसभेची पेरणी करून ठेवलीय याची अनेकांकडून वाच्यता होत असतांना दिसून आली.

जळगावहून पाळधीला लग्नाला जाणाऱ्यांसाठी खास वाहनांचीही व्यवस्था केली होती. अख्ख्या साईबाबा मंदिर परिसर गजबजून गेलेला होता. या लग्न सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळातील डझनभर मंत्र्यांची उपस्थिती तसेच सर्वपक्षीय नेते मंडळींची उपस्थिती होय. लग्नसोहळ्याला व्यासपीठावर मंत्री – माजी मंत्री – आमदार – खासदार यांनी हजेरी लावली. लग्न हा आनंदाचा सोहळा असला तरी या लग्न सोहळ्यात सुध्दा राजकारण्यांनी आपले राजकारण करून पोळी भाजून घेतली.

माजी मंत्री जळगावचे जामनेर विद्यमान आमदार गिरीश महाजन वधू-वरांना शुभाशिर्वाद देणारे भाषण केले. पाणी पुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांचा हा कौटुंबिक आनंदाचा सोहळा असून त्या आनंदात सहभागी होण्यासाठी सर्वपक्षीय नेतेमंडळी आमदार खासदार मंत्रीमहोदय उपस्थित आहेत. गिरीश महाजन एवढे बोलूनच थांबले नाहीत. तर गिरीश महाजन पुढे म्हणाले गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे शिवसेना आणि भाजप यांचा गेल्या 25 वर्षाचा संसार तुम्ही मोडलात असे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटलांना उद्देशून त्यांचे नाव घेऊन बोलताच एकच हंशा पिकला आणि थोडी राजकीय गंभीरताही निर्माण झाली. त्यामुळे व्यासपीठ लग्नसोहळ्याचे जरी असले तरी  समोर जमलेला मोठा जनसमुदाय दिसला रे दिसला की राजकारण्यांकडून संधी घेतली जाते हे कालच्या लग्न सोहळ्यातील गिरीश महाजनच्या भाषणावरून स्पष्ट झाले.

या संदर्भात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता गिरीश महाजन यांचे वक्तव्य गांभीर्याने घेत नाही असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. यानंतर लग्न सोहळा आटोपला आणि मग मात्र जमलेल्या जनसमुदायांमध्ये तसेच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच चर्चेला उत आला होता. प्रत्येक जण म्हणत होते की, गिरीश महाजनांनी या लग्न सोहळ्यात अशाप्रकारचे राजकीय वक्तव्य करायला नको होते. काहींचा सूर होता की, लग्नसोहळ्याच्या आनंदात अशाप्रकारे राजकीय कोपरखळी मारून आणखी आनंदात भर पाडली. तर काही जण म्हणायचे की, राजकारण्यांना प्रत्येक व्यासपीठ राजकीय वापरासाठी करायची सवयच झाली आहे. काही जणांचे म्हणणे पडले की, गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन हे दोघे गुजर समाजाचे असल्याने गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांचेतील नातेसंबंध राजकारणाच्या पलिकडे आहेत. त्यामुळे विनोदाने केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करू नये.

एकंदरीत माजी मंत्री गिरीश महाजन हे सातत्याने कुठल्या ना कुठल्या प्रकारे प्रकाशझोतात राहतात हा त्यांचा स्वभावच बनलेला आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याचा गांभीर्याने विचार करू नये. परंतु काही जण असेही बोलत होते की, पुन्हा शिवसेना आणि भाजप एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करतील हे महाजनांना सूचित करायचे नव्हते ना? गिरीश महाजनांच्या एका राजकीय वक्तव्यावरून अनेक प्रकारचे तर्क वितर्क राजकीय मंडपात ऐकायला मिळाले. त्यामुळे कोणत्यावेळी कोणते वक्तव्य केले म्हणजे त्याची चर्चा होऊन जाते हे राजकीय मंडळींनी पूर्णपणे जाणीव असते आणि तशा प्रकारची वक्तव्ये ते जाणीवपूर्वक करीत असतात. असो पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या चिरंजीवांचा लग्न सोहळा ऐतिहासिक असा पार पडला. गर्दीने उच्चांक मोडला. जेवणावळीचाही उच्चांक झाला. एवढ्या गर्दीतही कसलाही अनुचित प्रकार घडला नाही. सर्व काही शांततेत पार पडले. चि. विक्रम आणि चि.सौ.कां. प्रेरणाला पुढील वैवाहिक वाटचालीस  दै. लोकशाहीच्या हादिर्क शुभेच्छा!

Leave A Reply

Your email address will not be published.