रासायनिक खते छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री केल्यास कारवाई करणार ; कृषी विभागाचा इशारा

0

बुलडाणा  :  सध्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून येणारा खरीप हंगामासाठी रासायनिक खते व बियाणे खरेदीचे लगबग सुरू असून माहे एप्रिल 2021 पासून युरिया वगळता इतर रासायनिक खताच्या किमतीमध्ये रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी वाढ केलेली आहे. तरी खत विक्रेत्यांनी छापील दरापेक्षा जादा दर शेतकऱ्यांना आकारू नये, असे निदर्शनास आल्यास विक्रेत्यांविरूद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा कृषि विभागाने दिला आहे.

जिल्ह्यामध्ये एप्रिल 2021 पूर्वीचा व त्यानंतर पुरवठा झालेला डीएपी, एमओपी, 10:26:26, 12:32:16, 20:20:0:13, 19:19:19, 24:24:0 तसेच सिंगल सुपर फॉस्फेट इत्यादी रासायनिक खते बाजारात उपलब्ध आहेत.  जुन्या व नवीन दराचे रासायनिक खते बाजारात उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी करताना खताचे गोणी वरील किरकोळ कमाल विक्री किंमत (एम.आर.पी) पाहूनच खतांची खरेदी करावी. तसेच रासायनिक खत विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या ई-पॉस मशीनमध्ये जुन्या व नवीन रासायनिक खताचे दर वेगवेगळे नोंदविलेल्या असल्याने शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना ही ई-पॉस मशीनची पावती विक्रेत्याकडून घ्यावी व त्यावरून रासायनिक खताचे किमतीचे पडताळणी करता येईल, केंद्रशासनाच्या एन.बी.एस (न्यूट्रीयंट बेस्ड सबसिडी) धोरणानुसार युरिया वगळता इतर खताचे दर निश्चित करण्याचा अधिकार खत उत्पादक कंपनीचे असल्याने बाजारामध्ये एकाच प्रकारचे खताचे वेगवेगळ्या कंपनीचे भाव वेगवेगळे असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी वेळी वरील बाबींची खात्री करावी.

तसेच काही विक्रेत्याकडे जुन्या दराचे रासायनिक खत उपलब्ध असून देत नसल्यास किंवा जास्त पैशाची मागणी करत असल्यास व इतर रासायनिक खत, बियाणे व कीटकनाशक बाबत तक्रारी असल्यास आपल्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी, पंचायत समिती व जिल्हा स्तरावर कृषी निविष्ठा कक्षातील श्री अरुण इंगळे जिल्हा गुणवंत नियंत्रण निरीक्षक यांच्या 7588619505 व  विजय खोंदील, मोहिम अधिकारी जि.प यांच्या 7588041008 या मोर्बाइल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक व कृषी विकास अधिकारी श्रीमती अनिसा महाबळे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.