रावेर-यावल तालुक्यातील ऊस उत्पादकांची कुचंबणा !

0

जळगाव जिल्ह्यात रावेर आणि यावल हे दोन तालुके केळी उत्पादक म्हणून ओळखले जातात. केळीच्या पिकाबरोबरच ऊसाचे क्षेत्रही या दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे. केळी आणि ऊस या दोन्ही पिकाला बारमाही पाणी लागते. परंतु केळी व ऊस ही दोन्ही पिके शेतकऱ्यांची नगदी पिके म्हणून ओळखली जातात. आतापर्यंत केळी आणि ऊसावर  कुठलाही रोग पडत नव्हता  तथापि अलिकडे केळीवर करपा रोगाने ग्रासले आहे. तसेच ऊसाला सुद्धा विविध रोगांनी ग्रासले असले तरी पारंपारीक पिक म्हणून केळी आणि ऊस या दोन्ही या दोन्ही तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा म्हणून तत्कालीन मंत्री कै. बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या सहकार्याने  माजी मंत्री कै. जे. टी. महाजन यांनी फैजपूर जवळील न्हावी येथे मधुकर साखर कारखाना काढला. कै.जे. टी. महाजन संस्थापक चेअरमन म्हणून  सहकार क्षेत्रातील कारखाना त्यांच्या हयातीत उत्कृष्टपणे चालू होता. गेल्या दशकापासून मधुकर साखर कारखान्याला  घरघर लागली. गेले तीन वर्ष झाली हा कारखाना बंद पडलाय. कै. जे. टी. महाजनांचे सुपुत्र शरद महाजन हे चेअरमनपदी असताना हा कारखाना बंद पडला हे विशेष. कारखाना बंद पडण्याची अनेक कारणे असतील पैकी साखर कारखाने कारखान्यांसंदर्भातील  शासनाचे  धोरण हे एक प्रमुख  कारण आहे.

सत्तेवर असलेल्या  शासनाच्या धोरणानुसार साखर कारखाने चालविणे शक्य नसल्याने सहकारातील अनेक साखर कारखाने आजारी अवस्थेत पडून राहिले. कारखाना संचालक मंडळाचे मिस मॅनेजमेंट कारखाने आजारी पडण्याचे दुसरे प्रमुख कारण आहे. 40 वर्षे सुस्थितीत चालू असलेला मधुकर सह. साखर कारखाना 3 वर्षांपासून बंद पडल्याने  रावेर- यावल तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी कुचंबना होत आहे. शेतकऱ्यांंनी उत्पादित केलेला ऊस दुसऱ्या कारखान्यात मिळेल त्या भावाने विकावा लागतोय.

रावेर तालुक्यात दुसरा एक श्री क्षेत्र ओंकारेश्वर सहकारी साखर कारखाना माजी आमदार राजाराम गणू महाजन यांच्या नेतृत्वात उभा झाला. सहकार क्षेत्रातील  या कारखान्यातून साखर निघण्या आधीपासूनच कारखान्याला घरघर सुरु झाली. त्याची कारणे  सांगायची तर रकाने भरतील. सहकार क्षेत्रात सदर कारखाना चालविण्यास असमर्थ ठरलेल्या संचालक मंडळांनी  सदर कारखाना भाडे तत्वावर चालविण्यास एका कंपनीला दिला.  तथापि खाजगी कंपनी आणि संचालक मंडळ  यांच्यातील वादात सध्या कोर्ट कचेरी सुरु आहे.

तथापि श्री क्षेत्र ओंकारेश्वर कारखाना बंद अवस्थेत पडून आहे. त्यामुळे सदर साखर कारखाना नजिकच्या काळात सुरु होण्याची चिन्हे दिसत नाहीत. याला जबाबदार कोण? हा एक स्वतंत्र विषय होऊ शकतो. परंतु रावेर -यावल तालुक्यातील हे दोन्ही साखर कारखाने बंद पडले असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कोणी  वाली उरलेला नाही एवढे मात्र निश्चित.

जळगाव जिल्ह्यात सहकारी तत्वावर सुरु करण्यात आलेल्या एकुण सहा साखर कारखान्यापैकी जवळजवळ सर्वच कारखाने मोडीत निघालेले आहेत. पैकी मुक्ताईनगरचा कारखाना खाजगी कंपनीने विकत घेतल्याने  तो सुरु आहे. चाळीसगावचा बेलगंगा सहकारी साखर  कारखानासुद्धा खाजगी कंपनीने विकत घेतल्याने यंदा तो कसाबसा सुरु झाला आहे. तिसरा चोपडा सहकारी साखर कारखाना यंदा खाजगी कंपनीला भाडेतत्वावर चालविण्यास दिल्याने यंदा ते सुरु झालाय. परंतु कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे.  तशीच अवस्था रावेरच्या ओंकारेश्वर साखर कारखान्याची झाली आहे. तिसरा फैजपूरचा मधुकर सहकारी साखर कारखाना गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे.

यंदा भाडेतत्वावर देण्यासाठी जवळपास सर्व प्रक्रिया पुर्ण होत आली असली तरी पुढच्या हंगामापासून भाडेतत्वावर हा कारखाना सुरु होण्याची चिन्हे केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असताना विद्यमाना कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांनी आपला काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.  त्यांना अपेक्षा होती तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारकडून कारखान्याला आर्थिक मदत मिळेल. परंतु त्यांची अपेक्षा फलद्रूप झाली नाही. उलट भाजपचे सरकार सत्तेतून बाहेर गेले. महाविकास आघाडीचे सरकार दोन वर्षांपासून सत्तेत आले. त्यामुळे भाजपामध्ये प्रवेशणाऱ्या शरद महाजनांची मोठी कुचंबणा झाली. तरीसुद्धा विद्यमान आमदार शिरीषदादा चौधरी  यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडी सरकारकडून कारखान्याला सर्वोतोपरी सहकार्य मिळाले.

मंत्रीमंडळ समितीच्या वतीने  भाडेतत्वावर देण्यात तत्वत: परवानगी दिलेली आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज कारखान्यावर असल्याने बँकेने आपले पैसे कारखान्याकडून वसूल होण्यासाठी उत्पादित साखरेवर जप्ती आणली. त्यामुळे कारखाना भाडेतत्वावर देण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. तथापि कारखान्याचे तत्कालीन चेअमरन ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांनीसुद्धा भाडेतत्वावर देण्यासाठी तत्वत: मंजुरी दिली. आताचे बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर  हे सुद्धा सदर कारखाना सुरु व्हावा, याच विचाराचे आहेत. त्यामुळे मधुकर सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्यासाठी प्रक्रिया सुरु केली असली तरी त्याला पुढचा हंगाम उजाडणार आहे. तोपर्यंत या दोन्ही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मात्र कुचंबना सुरुच राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.