राज्यातील आठ तालुक्यात दुष्काळ जाहीर

0

जळगावमधील मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यांचा समावेश

मुंबई : 2017-18 च्या रब्बी हंगामासाठी राज्याच्या यवतमाळ, जळगाव आणि वाशिम या तीन जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळ जारी केलेल्या तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना लागू करण्याचा विचार सरकार करत आहे.

यवतमाळ मधील राळेगाव, दिग्रस, घाटंजी, केळापूर आणि यवतमाळ, वाशिम जिल्ह्यातील वाशिम आणि जळगावमधील मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे जून ते सप्टेंबर 2017 या कालावधीमध्ये कमी झालेला पाऊस तसंच भूजल पातळीत झालेली घट, पाण्याची उपलब्धतता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची उपलब्धता या सर्व गोष्टींचा विचार करुन, प्रभावित झालेल्या तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन, राज्यातील आठ तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.
दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्याला जमीन महसूलात सुट मिळणार असून सरकारी कर्जाचे पुर्नगठन होणार आहे. तसेच शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सुट मिळणार आहे. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेच्या कामांच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता दिली जाणार आहे. तसेच पाणी पुरवठ्यासाठी टँकर्सची सोय, शेती पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे, मध्यान्ह भोजन योजना दिर्घ मुदतीच्या सुटीच्या काळातही सुरू ठेवण्यात येणार आहेत.
तीव्रतेनुसार गंभीर दुष्काळ, मध्यम दुष्काळ आणि सामान्य स्थिती असे दुष्काळाचे वर्गीकरण केले जाते. या ८ तालुक्यात तातडीने दिलासादायी आठ उपाययोजना राबवाव्यात असे आदेश मदत आणि पुर्नवसन विभागाने जारी केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.