राजकीय नेतृत्वाचे खच्चीकरण खान्देशसाठी इतिहासाची पुनरावृत्ती

0

माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी परवा पत्रकार परिषद घेऊन खान्देशातील मुख्यमंत्रीपदाचे नेतृत्व संपविण्याचे षढयंत्र रचले गेले अशी खंत व्यक्त केली. आपल्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनात भ्रष्टाचार केल्याचा एकही गुन्हा मी केला नाही. 40 वर्षे भाजप या पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. इतकेच नव्हे तर खान्देशात शेटजी भटजींंचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपला एकनाथराव खडसेंनी बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख निर्माण केली. पक्षासाठी रक्ताचे पाणी करून खान्देशात पक्ष वाढवला. खान्देशात भाजपची शक्ती वाढली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्ष नेता म्हणून यशस्वी कामगिरी केली. भल्याभल्याची भंबेरी उडविली. अनेकांची लक्तरे उघडी केली. पुराव्यानिशी भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. त्यामुळे त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून कारकिर्द लक्ष्यवेधी ठरली.

भाजपसाठी त्याचे नेतेपद उपयोगी  ठरले. त्याआधी भाजप – सेना युतीची सत्ता असतांना पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द गाजली. त्यांच्याच काळात तापी खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. अर्थमंत्री म्हणूनही त्यांचा कार्यकाळ लक्षात राहणारा ठरला. त्यानंतर 2014 नंतर फडणवीसांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या युती सरकारच्या काळात महसूलसह 8 खात्याचे मंत्री होते. त्याआधी मुख्यमंत्री पदाचेही स्वप्न पाहिले. आणि त्या स्वप्नाने त्यांचा घात केला. स्पर्धक देवेंद्र फडणवीसांनी पध्दतशीरपणे पक्षात त्यांचे खच्चीकरण केले. पुणे – भोसरी, एमआयडीसीतील भूखंडाचे भूत उभे करून त्यांना मंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यानंतर न्या. झोटींग समिती नेमून सहा महिन्यात त्यांचा अहवाल येईल, असे जाहीर झाले. तथापि झोटिंग समितीचा अहवाल जाहीर केला गेला नाही. त्यांच्या मागे इतर शुक्लकाष्ट लावले गेले. गृहमंत्री हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेच होते. त्यामुळे नाथाभाऊंवर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले. परंतु या सर्व गुन्ह्यातून नाथाभाऊ सहीसलामत निर्दोष सुटले. तरीसुध्दा त्यांना मंत्रीमंडळापासून दूर ठेवले गेले. इतकेच नव्हे तर पक्षामध्येही त्यांना दुय्यम स्थान देण्यात येऊ लागले. त्यांना पक्षाच्या कोअर कमेटीतून परस्पर वगळण्यात आले. पक्षाच्या कार्यक्रमात त्यांना कोठेतरी बसवले जायचे. जेणेकरून भाजपमध्ये वरिष्ठ नेते असतांना त्यांना वारंवार डावलले जात असे. त्यामुळे भाजपातर्फे नाथाभाऊंचे मानसिक खच्चीकरण केले जात होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत तर त्यांचे विधानसभेचे तिकीटच कापले गेले. त्यांच्या कन्येला तिकीट देऊन तिचा विधानसभा निवडणुकीत पराभव केला गेला. या सर्वांचा नाथाभाऊंच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झाला. तथापि पक्षाविषयी त्यांनी कधीही अपशब्द काढला नाही.

एकनाथराव खडसेंनी महसूल मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचेकडील महसूल खाते आताचे भाजप प्रदेशाध्यक्ष तत्कालिन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटलांकडे देण्यात आले. महसूल खात्याचा भार स्वीकारतांना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘महसूल खाते मी सांभाळतोय म्हणजे रामाच्या पादुका भरत जसा सांभाळत होता तीच माझी भूमिका आहे त्या पादुका पुन्हा राम म्हणजे नाथाभाऊंकडेच सुपूर्द करणार,’ असे  वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटलांची भाषा नंतर बदलली. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यासाठी एकही मंत्री तयार होत नव्हते. शेवटी नाथाभाऊंचे जवळचे मित्र असलेल्या भाऊसाहेब फुंडकरांकडे ते सोपवले. परंतु फुंडकरांनी तीन -चार महिन्यातच जळगावचे पालकमंत्रीपद सोडून दिले. त्यानंतर जळगाव जिल्ह्याचे जामनेर मतदार संघातून निवडून आलेले आणि संघातून निवडून आलेले आणि जलसंपदा हे महत्वाचे खाते त्यांचेकडे असलेले गिरीश महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री होतील असे वाटत होते. परंतु त्यांनी सुध्‌दा पालकमंत्री होण्यास नकार दिला. त्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांचेकडे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा देण्यात आली. हा इतिहास सांगण्याचे तात्पर्य एवढेच की एकनाथराव खडसेंच्या विरोधात त्यावेळी पंगा घेण्यास गिरीश महाजनही तयार नव्हते. वास्तविक मुख्यमंत्री फडणविसांच्या अत्यंत नजिकचे गिरीश महाजन असतांना त्यांनी त्यावेळी कटूता टाळली. परंतु त्यांनतर मात्र मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर गिरीश महाजन नाचू लागले. जिल्ह्यातील भाजपत दोन गट पडले. परंतु सत्तेत असणाऱ्या आणि विशेषत: मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील असणाऱ्या गिरीश महाजन नाथाभाऊंच्या विरोधात उघडउघड दंड थोपटून उभे राहिले. केंद्रात आणि राज्यातील सत्तेचा काटा गिरीश महाजनांच्या बाजूने झुकला. ज्यांना नाथाभाऊंनी राजकारण शिकवले त्यांनीच नाथाभाऊंवर पलटवार केला. राजकीय सत्तेच्या हव्यासापायी आपल्या जिल्ह्यातील नेत्याच्या खच्चीकरणात गिरीश महाजन वाटेकरी बनले. राजकारणाचा इतिहास पहाता असे राजकीय नेत्यांचे खच्चीकरण यापूर्वीसुध्दा झालेले आहे. अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर खान्देशात नाशिकचे नेते कै. भाऊसाहेब हिरे यांचे नाव सर्व दृष्टीने आघाडीवर होते. ते सक्षमसुध्दा होते. परंतु यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे जमत नसल्याने कै. भाऊसाहेब हिरे यांचे मुख्यमंत्रपद हुकले. यशवंतरावांनी मोरारजी देसार्इंना हाताशी पकडून स्वत:कडे मुख्यमंत्रीपद खेचून आणले.

कै. भाऊसाहेब हिरेंवर अन्याय झाला.

खान्देशातील दुसरे एक राजकारणातील अभ्यासू नेते कै. मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी यांनी महाराष्ट्रात उपमंत्रीपदापासून अनेक मंत्रीपदे त्यांनी उपभोगली. त्यांच्या चारित्र्यावर भ्रष्टाचाराचा कसलाही डाग नव्हता. जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. जिल्ह्यातील हतनूर, वाघूर आणि इतर मध्यम लघु प्रकल्प त्यांच्याच काळात झाले. सहकार क्षेत्रातील मधुकर, वसंत आणि बेलगंगा हे साखर कारखाने त्यांच्यात काळात झाली. खडका सूतगिरणी नगरदेवळा सूतगिरणी त्यांच्याच काळात झाली. जळगाव आकाशवाणी त्यांचीच देण आहे. पाल येथील प्रकल्प त्यामुळेच झाले. अशी अनेक विकासकामाची यादी देता येईल. विकासाचे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी निर्माण केले. शिक्षणमंत्री असतांना श्वेतपत्रिका त्यांनीच मांडली. एवढे असतांना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव चर्चिले जाऊ लागले. तेव्हा दिल्लीतील काँग्रेस नेत्यांशी संधान बांधून कै. शंकरराव चव्हाण हे त्यांच्या मार्गातील अडसर बनले आणि मुख्यमंत्रीपदाचा त्यांचा पत्ता कटला.

आता खान्देशातील तिसरे नेते म्हणजे एकनाथराव खडसे यांच्या बाबतीत तसेच घडले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वाधिक मोठा पक्ष होता. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथराव खडसे यांनी आपली इच्छा व्यक्त केली परंतु दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी विशेषत: प्रधानमंत्री मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांवर विश्वास व्यक्त केला. त्यामुळे फडणवीस यांचे नाव जाहीर झाले. नाथाभाऊंचे नाव मागे पडले. परंतु आपल्या स्पर्धेत नाथाभाऊ वरचढ ठरतील म्हणून फडणवीसांनी पध्दतशीर नाथाभाऊंचे खच्चीकरण केले. पक्षातून बाहेर पडण्याची स्थिती निर्माण केली. नाथाभाऊंनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या  राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांचे मागे इडीचे शुक्लकाष्ट लावले. कर नाही त्याला डर कशाला म्हणून ते इडीचा सामना करताहेत. त्यातून सहीसलामत निर्दोष सुटण्याचा त्यांना आत्मविश्वास आहे. ते त्यातून सहीसलामत सुटावे आणि त्यांचे खादेशातील नेतृत्व पुन्हा बहरून यावे, याच त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.

– धों.ज. गुरव

सल्लागार संपादक

दै.लोकशाही,

 

Leave A Reply

Your email address will not be published.