यावल येथे काँगेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तालुक्यासह जिल्ह्यात काँग्रेसची पूर्ववत सत्ता आणावयाची असेल तर कार्यकर्त्यांनी डिजिटल कार्यकर्ता न होता पक्षासाठी संघर्ष करण्याची तयारी करावी लागेल असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी बुधवारी येथील यावलच्या जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे आवारात आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अध्यक्षपदावरून व्यक्त केले.

आगामी काळात सहकारी संस्था तथा नगर परिषदा, जिल्हा परिषद व येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेसच्या वतीने  येथील तालुकाध्यक्ष प्रभाकर सोनवणे व पदाधिकार्‍यांच्या वतीने येथील खरेदी-विक्री संघाचे आवारात बुधवारी तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.

अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पवार होते.  तर प्रमुख पाहुणे म्‍हणून जिल्हा निरीक्षक तथा अहमदनगरचे महापौर दीपक चव्हाण, आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील, विनोद कोळपकर, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना प्रदीप पवार पुढे म्हणाले की, जिल्ह्यात काँग्रेसची सत्ता आणावयाची असेल तर ग्रामस्तरावर वरून प्रत्येक कार्यकर्त्याने संघर्ष करायला पाहिजे. सध्याचे काळात कार्यकर्ते डिजिटल झाले आहेत. डिजिटल म्हणजे बॅनर पुरते मर्यादित हे कार्यकर्ते टिकाऊ नसतात तर कुंभाराच्या मडक्या प्रमाणे घडलेले कार्यकर्ते हे भविष्यात पदांवर पोहोचतात.  कार्यकर्त्यांनी केवळ प्रसिद्धी पुरते त्यांनी काम करू नये असे मतही पवार त्यांनी व्यक्त केले.  आगामी सहकारी संस्था नगरपरिषदेचे सह होणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेसची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करू असेही त्यांनी सांगितले.

आमदार शिरीष चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले, जिल्ह्यात एकमेव रावेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची सत्ता आहे.  लोकांची कामे करावयाची असेल तर सत्तेत वाटेकरी असले तर लोकांची कामे होतात.  पक्षश्रेष्ठींकडून पाहिजे तसे सहकार्य मिळत नाही हे निरीक्षकांनी नोंद घ्यावी व तसे पक्षश्रेष्ठी समोर मांडावे.  पैसा आणि सत्ता हे साधन आहे, आम्ही संघटन देऊ शकतो आमच्याकडे तोफ आहे मात्र दारूगोळा नाही ही खंत आहे, अशी व्यथाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, निरीक्षक चव्हाण जिल्हा महिला अध्यक्ष सुलोचना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन प्रदीप सोनवणे, तर आभार अमोल भिरूड यांनी केले. कार्यक्रमात सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे व परिषदेचे पदाधिकाऱ्यांनी निरीक्षक चव्हाण यांचा गौरव केला.

कार्यक्रमात चिखली कोसगाव येथील महिलानी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितीन चौधरी, यावल पंचायत समिती सदस्य उमाकांत पाटील, सरफराज तडवी, आदीवासी सेलचे जिल्हाध्यक्ष मासूम तडवी, महीला काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाच्या जिल्हा अध्यक्ष प्रतिभा मोरे, चंद्रकला इंगळे, शहराध्यक्ष कदीर खान, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे,  चाळीसगावचे अनिल निकम, जामनेरची शरद पाटील यांचेसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.