यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द..

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

पुणे: राज्यात व शहरात वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या आणि राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी नियमावली बदलण्यात येत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर येत्या २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेला ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात येत असल्याचे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले आहे.

यंदा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने महोत्सव व्हावा अशी रसिकांची प्रबळ इच्छा होती. परंतु महोत्सवाची भव्यता, व्याप्ती व आयोजनासाठी लागणारा वेळ बघता सद्य परिस्थितीत महोत्सव रद्द करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचे जोशी यांनी सांगितले.

आर्य संगीत प्रसारक मंडळाने जन्मशताब्दी वर्षाची सांगता ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाने करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दि. २ ते ६ फेब्रुवारी, २०२२ या कालावधीत मुकुंदनगर येथील कटारिया प्रशालेच्या प्रांगणात हा महोत्सव रंगणार होता. त्यावेळी राज्य सरकारची जी नियमावली प्रचलित असेल त्याचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले होते.

राज्य शासनाने बंदिस्त सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ५० टक्के तर खुल्या मैदानातील आयोजनासाठी 25 टक्के क्षमतेची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र २५ टक्के क्षमतेमध्ये सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आयोजित करणे शक्य नसल्याची भूमिका मंडळाने घेतली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चित्रपटगृहे, नाट्यगृहांसह इतरही सांस्कृतिक कार्यक्रमांना शंभर टक्के क्षमतेने कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देण्याचे जाहीर केले आणि त्यामुळे चालू महिन्याच्या अखेरीस महोत्सव आयोजित करण्याच्या हालचाली आयोजकांनी सुरू केल्या होत्या.

मात्र ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा अवघ्या काही तासाच हवेत विरली. त्यामुळे आयोजकांच्या आनंदावर विरजण पडले. परंतु, पंडितजींच्या जन्मशताब्दी वर्षातच महोत्सवाचे आयोजन व्हावे याकरिता सवाई गंधर्व रसिक मंडळाने ५० टक्के क्षमतेच्या उपस्थितीत शासनाने आयोजनास परवानगी द्यावी याकरिता मोहीम राबविली होती. अखेर सरकारच्या नियमात वारंवार बदल होत असल्याने महोत्सव रद्द करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.