मुक्ताईनगरात चोरांनी उचलून नेले कपाट; ३ लाख १५ हजाराचा ऐवज लंपास

0

मुक्ताईनगर :– शहरातील तलाठी कार्यालयाजवळ घरी कोणी नसल्याचा फायदा घेत मध्यरात्री चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून, घरातील लोखंडी गोदरेज कपाट उचलून नेले. घरापासून ६०० मीटर अंतरावर निर्जन जागेत कपाट उघडून सोने-दागिने,५० हजार रुपये रोख आणि २० हजार रुपयांचा लॅपटाॅप असा एकूण ३ लाख १५ हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना दि.२३ रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील तलाठी कार्यालयाजवळ बेकरी व्यवसायिक मधू इरेगोडा आप्पा (रा.उगणे, जि.हसन, कर्नाटक,ह.मु.मुक्ताईनगर) राहतात. त्यांचे मुक्ताईनगरात मिठाईचे दुकान आहे. बोदवड येथील नातेवाईक आजारी असल्याने गेल्या तीन दिवसांपासून ते बोदवडला पत्नीसह गेले होते. त्यामुळे त्यांचे घर कुलूपबंद होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून, घरातील लोखंडी गोदरेज कपाट उचलून नेले. कपाटातील ४५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, २५ ग्राॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, २० ग्रॅमचा नेकलेस, ८ ग्रॅमची अंगठी असे ९८ ग्रॅम सोने, एक लॅपटाॅप, ५० हजार रोख असा एकूण ३ लाख १५ हजारांचा ऐवज लांबवला आहे. दरम्यान, घराशेजारीच त्यांचे दुकानातील मजूर राहतात. चोरीची घटना मंजुरांना सकाळी ८.३० वाजता निदर्शनास आल्यानंतर त्यांनी दुकानदार मधू इरेगोडा आप्पा यांना माहिती दिली त्यानंतर ते तत्काळ मुक्ताईनगरला परतले. डीवायएसपी संजय देशमुख हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनास्थळी श्वान पथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानने घरापासून सुमारे ६०० मीटर अंतरावर असलेल्या रेणुकामाता मंदीर परिसरापर्यंत मार्ग दाखवला. त्याच ठिकाणी चोरट्यांनी घरातून उचलून आणलेले कपाट सापडले. कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.