मुंबईत पावसाचा कहर; चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईमध्ये पावसाने कहर केल्याने कालची रात्र काळरात्र ठरली आहे. चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांना मृत्यू झाला आहे.

चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला आहे. येथे बचावकार्य अजूनही सुरु आहे. तर विक्रोळीत झोपडपट्टी कोसळून सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर भांडूपमध्येही भिंत कोसळून 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, मुंबईत भिंत कोसळून मृत झालेल्या व्यक्तिंच्या परिवाराला प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे.

तर या घटनांमधील जखमींना 50 हजार रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान मदत निधीतून मदत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी येथे भिंत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीची घटना पाहून व्यथित झालो आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना प्रकट करत आहे. जखमी झालेल्या व्यक्तिंच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार व्हावा ही प्रार्थना करतो, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

चेंबूरमधील घटना हृदयविदारक देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, घटनेबाबत ऐकून स्तब्ध झालो आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या परिजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना संकटातून सावरण्याची शक्ती देवो, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

शनिवारी मध्यरात्री चेंबूरच्या भारतनगर परिसरामध्ये दरड कोसळल्यामुळे 17 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून घरांच्या संरक्षणासाठी बांधलेली भिंत पडल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्य सुरू आहे. दरड कोसळू नये यासाठी बांधण्यात आलेली भिंतच घरांवर कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे विक्रोळी सुर्यनगरमध्ये पंचशील नगर मधील झोपडपट्टी कोसळून सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.