मुंबईची लाईफलाईन लोकल अत्यावश्यक सेवेसाठी आजपासून सुरु

0

मुंबई : गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन लोकल आजपासून पुन्हा सुरु झाली आहे.  आज पहाटे साडे पाच वाजता चर्चगेटहून विरारसाठी पहिली लोकल रवाना झाली. त्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही लोकल सुरू करण्यात आली आहे.

मुंबई महानगर परिसरातून कामानिमित्त ये-जा करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलगाडय़ा चालवण्यावर रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारचे एकमत झाले. त्यामुळे आज (15 जून) पहाटे पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, विरार, तर मध्य रेल्वेवरील ठाणे, सीएसएमटी यासारख्या स्थानकांवरून लोकल सुटल्या.
मध्य रेल्वेवर 200 तर पश्चिम रेल्वेवर 130 लोकलच्या फेऱ्या होण्याची शक्यता आहे. मात्र,सर्वसामान्य प्रवाशांना अद्याप लोकलने प्रवास करता येणार नाही.

लोकलचा वापर केवळ अत्यावश्यक सेवेत काम करणारे म्हणजेच पोलीस, नर्स, डॉक्टर, पालिकेचे सफाई आणि इतर कर्मचारी, पत्रकार अशा काही ठराविक कर्मचाऱ्यांनाच  करता येणार आहे.

राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार, केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या आयडी कार्डच्या माध्यमातून त्यांना स्थानकांवर प्रवेश दिला जाईल. यानंतर कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड आधारित ई-पास दिले जातील.  जे कर्मचारी वैद्यकीय दृष्ट्या सुदृढ आहेत. त्याच व्यक्तींना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. तसेच कंटेन्मेंट झोनमधून कर्मचारी कामावर येणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

शेवटची लोकल रात्री ११.३० वाजता सुटणार आहे. अप आणि डाउन दिशेला दर १५ ते २० मिनिटांनी लोकल धावणार आहे. पश्चिम रेल्वेच्या लोकल चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरिवली या स्थानकांवर व त्यानंतर दहिसर ते विरार दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील. मध्य आणि हार्बरवर जलद मार्गावर लोकल चालवण्यात येणार आहेत. चर्चगेट-विरार, विरार-डहाणू, सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी-पनवेल या मार्गांवर लोकल धावतील. अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र पाहूनच प्रवाशांना रेल्वे स्थानकांत प्रवेश देण्यात येईल. इतर प्रवाशांना लोकलमधून प्रवास करता येणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.