माहेजी देवी यात्रा उत्सव आजपासून प्रारंभ

0

पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील माहेजी येथे उद्या दि.१० शुक्रवारपासून माहेजी देवी यात्रा उत्सवास सुरुवात होत आहे. दरवर्षी पौष पौर्णिमेच्या दिवसापासून पंधरा दिवस चालणाऱ्या यात्रा दरम्यान भाविकांचे देवीला नवस फेडणे, देवीला साडी चोडीचा आहेर चढविणे, पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उपस्थितीत पौर्णिमेच्या दिवशी गावात पालखीची मिरवणूक काढणे, मान्यवरांच्या शुभहस्ते देवीच्या पादुकांचे पूजन करून अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल या यात्रांमध्ये होत असते.
यात्रेबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण महाराष्ट्रसह जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध माहिजी देवी असलेले व ब्रिटिश काळापासुन सुरू असलेल्या इंग्रजांच्या राजवटीपासून परंपरा असलेली भाविकांच्या मनात श्रद्धास्थान करून अतुट श्रद्धा निर्माण करणारी माहेजी मातेची यात्रा आजपासून प्रारंभ होत असुन या देवीच्या मंदिराची देखभालकरून व्यवस्थापन सांभाळणारे माहेजी येथील भगत पाटील कुटुंबातील प्रत्येक घरातील भाऊ बंदकीला गुढीपाडवा ते पुढचा पाडवा या एका वर्षाची मंदिराची व्यवस्था ठेवतात. यावर्षी भगत म्हणून लोटन भगत, हिलाल भगत, लालचंद भगत, रामकृष्ण भगत, या कुटुंबांकडे जबाबदारी आहे. दि. १० जानेवारीपासुन ह्या यात्रेस प्रारंभ होत असुन ह्यायात्रेत नवस फेडण्यासाठी प्रथासुरु आहे.

यात्रेला तीनशे वर्षांची परंपरा
यात्रेला तीनशे वर्षांची परंपरा लाभलेली असुन ब्रिटिश सरकारच्या राजवटीपासून या यात्रेची सुरुवात झाली असुन या माहेजी देवीच्या नावामुळे माहेजी गावापासून सुमारे साडेतीन किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे स्टेशनला माहेजी हे नाव देण्यात आले असून तसे पाहता या रेल्वे स्टेशनच्या जवळच असलेल्या कुरंगी व नांद्रा हे गावे जवळ येतात. मात्र देवीची महिमा प्रख्यात असल्याने ब्रिटिशांनी या स्टेशनला माहेजी हे नाव देण्याचे निश्चित केले असल्याचे समजले जाते.

देवीची आख्यायिका
या देवीची आख्यायिका माहेजी देवी व तिची लहान बहीण चिंचखेडे गावात येत असतांना गावातील लहान मुलांनी त्या दोघी बहिणींना हिणवले. त्या वेड्या आहेत असे समजले. याचा संताप येऊन देवीने तिच्या तिक्ष्ण नजरेने पाहून त्या मुलांना मुठीत केले हे पाहून गावातील लोकांनी देवीला विनंती करून त्या लहान मुलांना शुद्धीवर आणले नंतर या दोघी बहिणी त्या जागेवर अदृश्य झाल्या. ज्या ठिकाणी हा प्रकार घडला त्या ठिकाणी त्रिशुला व बाण निघाले हे पाहून ग्रामस्थांनी देवी प्रकट झाली असे म्हणून तेथे विधिवत पूजा करून भव्य मंदीर बांधले व त्या दोघी बहिणींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. यानंतर या चिचखेडा गावाला माहेजी म्हणुन संबोधले जाऊ लागले.

पादुका पूजन व पालखी मिरवणूक
पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सहा वाजता देवीच्या पादुका पालखीत ठेवून संपूर्ण माहेजी गावात व परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत व माहेजी ग्रामस्थांच्या नियोजनात सर्व आनंदी होऊन संपूर्ण ग्राम प्रदर्शना काढण्यात येते. मिरवणूक संपल्यावर देवीच्या पादुकांचे पुजन करुन मंदिरात ठेवण्यात येतात. दहिगाव (संत) येथील गव्हर्मेंट कॉन्ट्रक्टर एल. एच. पाटील यांनी यावर्षी देवीच्या पादुकांसाठी ५१ हजार रुपयांची देणगी दिली असुन तर पाचोरा येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल चे संचालक डॉ. भुषण मगर यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात येणार असुन यावेळी पाचोरा – भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील हेही उपस्थित राहणार आहे.

भाविकांच्या आरोग्याची काळजी घेणार
माहेजी यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या भाविकांची याठिकाणी स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतीने विशेष दखल घेतली असून यात्रेत दररोज साफसफाई करणे, पिण्याच्या पाण्यामध्ये टी. सी. एल. पावडर टाकणे, रोगराई पसरू नये म्हणून बी. ए. सी. पावडर टाकणे याचबरोबर यात्रेत लहान – मोठ्या सुविधांची काळजी घेतली जाणार असल्याची माहिती सरपंच मनीषा शत्रुघ्न साळवे व ग्रामसेवक बी. पी. पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना दिली व ग्रामपंचायत सदस्य व शिपाई यांनी विशेष काळजी घेण्याचे सांगितले आहे.

यात्रेत चोख पोलिस बंदोबस्त राहणार
पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या यात्रेत कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये म्हणून यात्रेत दहा दिवस राहुटी (तंबु) टाकून अनुचित प्रकार घडविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून कोणत्याही भाविकांना त्रास होणार नाही असा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती तर यात्रा यशस्वीतेसाठी येथील सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ पोलिस प्रशासनासह परिसरातील भाविक विशेष काळजी घेणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.