महाविद्यालयीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ; विद्यापीठाकडून वेळापत्रक जाहीर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वाच्या आधारे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळांसाठीचे शैक्षणिक वर्षे २०२१-२२ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्‍यानुसार येत्या १ सप्टेंबरपासून नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत आहे.

देशातील कोवीड- १९ या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत महाराष्ट्र शासन/ विद्यापीठ अनुदान आयोगाकडून पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून वर्ग सुरू राहतील; अशा सूचना विद्यापीठाच्या या परिपत्रकात करण्यात आल्या आहेत. प्रभारी कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन व प्रभारी प्र- कुलगुरू प्रा. बी. व्ही. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

शुक्रवार अर्थात ६ ऑगस्टपासून पदवी व पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ३० सप्टेंबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने पूर्ण केली जाईल. १ सप्टेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्षाचे सत्र सुरू होईल.

या सत्राच्या परीक्षा १३ डिसेंबर २०२१ ते १५ जानेवारी २०२२ या दरम्यान घेतल्या जातील. १७ ते २३ जानेवारी २०२२ दरम्यान पुढील सत्राच्या तयारीचा कालावधी असेल. त्यानंतरचे सत्र २४ जानेवारी २०२२ पासून सुरू होईल. या सत्राच्या परीक्षा १ मे २०२२ ते ५ जून २०२२ या कालावधीत होतील. ६ जून ते १५ जून दरम्यान पुढील सत्राच्या तयारीचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर १६ जून २०२२ पासून पुढील नव्या शैक्षणिक वर्षाला सुरूवात होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या या परिपत्रकात संबंधित महाविद्यालये व विद्यापीठ प्रशाळा आणि परिसंस्थांना कळविण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.