महाराष्ट्र-कर्नाटक पाणी वाटप करार लवकरच

0

दरवर्षी कृष्णा नदीच्या काठावरील गावांना उन्हाळ्यात भेडसावत असणारी पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकार बरोबर परस्पर पाणी वाटप करार करण्यासाठी कर्नाटक सरकार तयार असल्याची माहिती कर्नाटकचे जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.

कृष्णा नदीचं पाणी कर्नाटकाला सोडण्यासाठी सोमवारी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बेळगाव, बागलकोट आणि विजापुरातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीनंतर शिवकुमार यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना ही माहिती दिली. कर्नाटक सरकारने 4 टीएमसी पाणी महाराष्ट्राला द्यावे आणि त्या बदल्यात महाराष्ट्र कर्नाटकाला 4 टीएमसी पाणी देईल, असा प्रस्ताव महाराष्ट्र सराकारने दिला असल्याचे त्यांनी सांगितले. २००४ पासून २०१७पर्यंत कर्नाटकने महाराष्ट्राकडून पाणी विकत घेतले आहे. यापुढे परस्पर पाणी वाटप करार करून दोन राज्यातील पाणी समस्या निवारण्यासाठी कर्नाटक सरकार तयार आहे. त्या संबंधीचे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांकडून महाराष्ट्र सरकारला पाठविण्यात येईल. पाणी वाटप करार कसा, असावा या संबंधी निर्णय घेण्यासाठी तांत्रिक समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती तांत्रिक आणि अन्य बाबींचा विचार करून अहवाल देणार आहे. त्यामुळे कर्नाटक महाराष्ट्राला आणि महाराष्ट्र कर्नाटकला पाणी देण्याबाबत पाणी वाटप करार लवकरच करण्यात येईल, असेही जलसंपदा मंत्री डी. के. शिवकुमार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.