चोरट्यांनी एटीएमऐवजी पासबुक प्रिंटिंग मशीन लांबविले

0

जळगाव :- तालुक्यातील कुसूंबा गावात सोमवारी (दि. ६) पहाटे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न फसला. चोरट्यांनी एटीएमऐवजी पासबुक प्रिंटिंगचे मशीन चोरून गावापासून काही अंतरावर फेकून पळ काढला. चोरट्यांच्या गोंधळाचा प्रकार जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला असून, साक्री रोडवरील विद्यावर्धिनी महाविद्यालय परिसरात गेल्याच आठवड्यात कॅनरा बँकेचे एटीएम लुटीचा प्रयत्न फसला होता. यानंतर आताच्या घटनेने पोलिसांच्या सुरक्षेव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चोरट्यांनी सुरुवातीस कुऱ्हाडीने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते अयशस्वी ठरले. यानंतर चोरट्यांनी बाजूला असलेल्या पासबुक प्रिंटिंग मशीन ओढून नेत गावाबाहेर फोडून फेकून दिले. त्यांना या मशीनमध्ये रोकड हाती न लागल्याने त्यांचा अखेर भ्रमनिरास झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डेसह पथकासह घटनास्थळी दाखल झाले. या वेळी त्यांनी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सर्व माहिती जाणून घेत पंचनामा केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हे चोरटे एटीएम सेंटरमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून धुळे तालुक्यात गुन्ह्याच्या घटना वाढत असून, त्यावर वचक लावण्यात पोलिस दल अपयशी ठरत आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, चोरट्यांना रोखण्याचे आव्हानच आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.