महामार्गावरील अपघाताची मालिका सुरुच…!

0

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्र. 6 चे चौपदरीकरण अत्यंत धिमे गतीने सुरू आहे. कंत्राटदाराकडून त्याबाबतीत अनेक कारणे सांगितले जात असले तरी जळगावकरांसाठी हे काही नवीन नाही. महामार्ग विभाग (नही)चे अधिकारीसुध्दा विविध अतिक्रमण काढण्याचा प्रश्न वीजेचे खांब हटविणे, पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकणे, जामीन ॲक्वायर करणे आदि बाबींमुळे कंत्राटदाराला काम करणे अवघड जाते असे त्यांचे म्हणणे. महानगरपालिका आणि वीज वितरण यांचेकडे बोट दाखविण्यात येते. परंतु ज्यावेळी कामाची निविदा दिली गेली तेव्हा या बाबींचा विचार का होत नाही हे मात्र एक कोडेच आहे. दरम्यान अपुऱ्या अरूंद महामार्गावर वाहनांची संख्या मात्र वाढली. परिणामी अपघाताची मालिका मात्र थांबत नाही. नाहक सर्वसामान्यांचा जीव जातोय. किड्या- मुंग्यांसारखे लोक अपघातात मृत्यू पावताहेत.

सोमवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास महामार्गावरील बांभोरी पुलाजवळ एरंडोलहून जळगावकडे दुचाकीने येणाऱ्या माय लेकाला टँकरने चिरडले. टँकरच्या मागील चाकात दुचाकी आली आणि त्यात एरंडोलच्या रहिवासी चारुशिला पाटील आणि त्यांचा मुलगा निशांत हे जागीच ठार झाले. तर मयत चारुशिला पाटील यांची बहीण रूपाली पाटील या जखमी झाल्या. पाळधीपासून ते तरसोद पर्यंतचा महामार्ग म्हणजे मृत्यू मार्ग बनलेला आहे. फागणे ते तरसोद पर्यंत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून पाळधीपासून जळगाव शहराच्या बाहेरून त्या मार्गाचे काम सुरू आहे. तथापी पाळधी ते तरसोद जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण मंजूर होऊन तीन वर्षे झाली. या महामार्गावर खोटेनगर ते कालिंकामाता हा 2 कि.मी. च्या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.

शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या या महामार्गावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. महामार्गाला क्रॉस करून शहरातील दुचाकी स्वार, सायकल स्वार, चार चाकी वाहने आणि पायी जाणारे शालेय विद्यार्थ्यांपासून ते शहरातील लोक जातात आणि येतात. हा महामार्ग क्रॉस करण्यासाठी जिव मुठीत धरावा लागतो. अपघातात अनेक जणांचा बळी गेला. अपघाताची मालिका मात्र थांबता थांबत नाही. 8 कि.मी. चे चौपदरीकरण युध्दपातळीवरून व्हायला हवे. परंतु त्या बाबतीत कुणालाही देणे घेणे नाही. शहराचे आमदार, खासदार, महापौर, उपमहापौर, नगरसेवक आदि लोकप्रतिनिधी असंवेदनशील बनले आहेत. निवडणुकीच्या काळात मते मागण्यापुरते ते जनतेला भेटत असतात आणि मते मागतात. एकदा निवडून आले की ते ढुकूनही पहात नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

संबंधित खात्याचे अधिकारीसुध्दा जणू गेंड्याची कातडी पांघरलेले आहेत असे म्हटले तर ती अतिशोक्ती होणार नाही. कंत्राटदारावर कोणाचाही वचक नाही. त्याचे कारण काय? या प्रश्नाचे उत्तर साधे आहे. कंत्राटदाराकडून संंधितांना जो मलिदा मिळायचा तो मिळतो म्हणून लोकप्रतिनिधीनी संंधित खात्याचे अधिकारी अगदी सोयीस्कर दुर्लक्ष करतात.  याबाबत अनुभव शिवाजी नगर रेल्वे उड्डाण पुलाच्या संदर्भात आलेला आहे. शिवाजी नगर उड्डाण पुलाच्या बांधकामाची निविदा दिली गेली तेव्हा दिड वर्षात त्यांचे काम होणे अपेक्षित होते. सुमारे तीन वर्षे होत आली तरी काम अद्याप अपुर्ण आहे. आता महावितरणकडून विजेचे खांब काढण्यास सुरुवात झाल्याने आता शिवाजी नगर उड्डाण पूलाच्या कामाचा मार्ग मोकळा झालाय अशी हुशारकी मारली जातेय. जणू काय हे जळगावकरांवर उपकारच करण्यात येते आहे. या पुलावरून ये-जा करणाऱ्या दोन लाख जनतेस जणू वेठीस धरले जात आहे. त्याचे कोणाला देणे घेणे नाही.

जळगाव शहरासह रस्ते नव्हे तर खड्ड्याचे रस्ते याबाबत 6 लाख जळगावकर त्रस्त झाले आहेत. शहरातील खड्ड्यामुळे सुध्दा काही जणांना प्राणांस मुकावे लागले. विधीमंडळ अंदाज समितीने महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढले नागरिकांनी आपली स्वतःची किडनी द्यायला तयार झाले आमची किडणी घ्या  पण त्या पैशातून रस्ते दुरुस्त करा. तरीसुध्दा मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधीना जाग येत नाही. जळगाव शहर वासियांच्या भावनेशी जणू हा खेळ चाललाय. खोटेनगर ते कालिकांमातापर्यंत चौपदरीकरण होत आहे. बांभोरी ते खोटे नगर आणि कालिकांमाता ते तरसोदपर्यंत महामार्गाच्या रुंदीकरणारचे साईड पट्या करून केले जात आहे. परंतु केलेल्या साईडपट्या वाहून गेल्या आणि महामार्ग जैसे थे अरूंद राहिला आहे. अत्यंत निकृष्ट प्रतिच्या साईडपट्याचे काम झालेय. याला जबाबदार कोण? पालकमंत्री प्रत्येक ठिकाणी जाऊन काम पाहू शकत नाही. परंतु संंधित खात्याचे अधिकारी करतात काय? हा खरा प्रश्न आहे. आंधळं दळतंय आणि कुत्रं खातंय अशी अवस्था झालेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.