प्रवाशांसह पुराच्या पाण्यात एसटी बस गेली वाहून; बचावकार्य सुरू

0

यवतमाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात  गुलाब वादळामुळे मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असून अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती उद्भवली आहे. यातच यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथून 2 किमी अंतरावर असलेल्या दाहगाव नाल्याला आलेल्या पुरात बस वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

नांदेड-नागपूर ही घटरोड डेपोची बस उमरखेडहून पुसदमार्गे नागपूरसाठी निघाली पण उमरखेडपासून 2 किमी अंतरावर असलेल्या दाहगाव नाल्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत होते. या पाण्याचा अंदाज न आल्याने बस चालकाने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला. पण बस काही मीटर अंतरावर गेल्यानंतर ती सरळ नाल्यात कोसळली आणि वाहत जाऊ लागली.

सदर  घटना काही प्रत्यक्षदर्शींनी बघितल्यानंतर तेथे असणाऱ्या लोकांपैकी काही तरुणांनी बसमधील प्रवाशांना वाचविण्यासाठी तात्काळ नाल्याच्या पुरात उड्या घेतल्या. सुदैवाने तोपर्यंत ही बस एका झाडाला जाऊन अडकली होती. त्यामुळे तरुणांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. या बसमध्ये एकूण 4 ते 6 प्रवाशी असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

बस नाल्याच्या पुरात वाहून जात असताना काही तरुण रस्त्यावर होते. यापैकी एका तरुणाने बस वाहून जात असल्याचा व्हीडिओ आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला. तसेच रस्त्यावर असलेल्या काही नागरिकांनी देखील मोबाइलमध्ये ही घटना कैद केली.

उमरखेड तहसीलदार ठाणेदार सध्या घटनास्थळी पोहचले आहेत व स्थानिक नागरिक व तालुका टीमच्या सहाय्याने लोकांना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आपला जीव वाचविण्यासाठी दोन लोकं हे झाडावर चढून बसले आहेत. तर दोन लोकं एसटी बसच्या टपावर जीव मुठीत घेऊन बसले आहेत. या सर्वांना वाचविण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.