महवितरणच्या गलथान कारभाराची लक्तरे

0

जळगाव येथे एका जून महिन्यात विजेच्या तारा तुटून तीन गंभीर घटना घडल्या. मेहरुण येथील संतोषी माता चौकात उच्च चौकात उच्च दाब क्षमतेच्या वीज वाहिनीची तार तुटून रिक्षावर पडल्याने दोन तरुणांचा होरपळून मृत्यू झाला त्यानंतर जिल्हा रुग्णालयासमोर विजेची तार तुटून पडली. परंतु सुदैवाने एकाचा जीव वाचला आणि दोन तीन रिक्षा बचावल्या त्यानंतर 1 जुलै रोजी मुंबई, नागपूर महामार्गावर दूरदर्शन टॉवर जळगाव उच्च दाबाची विजेची तार तुटून तीन आराम बसेसचा कोळसा झाला. सुदैवाने प्राणहानी टळली. परंतु सुमारे 30 लाख रुपयांचे आरामबसेसचे नुकसान झाले. यावेळी तीन बसेस जळत असताना महामार्गावरील दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. महावितरणच्या वीज तारा जणू जळगावकरांच्या जिवावर उठल्या आहेत. जळगाव शहरातून विशेषत: आयोध्या नगरातून उच्च दाबाच्या वीज वाहिन्या भर वस्तीतून गेल्या आहेत. ज्यावेळी या विज वाहिन्या या भागातून नेण्यात आल्या त्यावेळी अयोध्यानगरमध्ये तुरळक वस्ती होती. आता दाट वस्ती झालेल्या गेल्या 15 वर्षात अयोध्यानगरचा परिसर अंत्यंत दाट वस्तीचा बनला आहे. तेव्हा आता दाट वस्ती झाल्यानंतर त्या भागातून गेलेल्या उच्च दाबाच्या वाहिन्या जमिनीतून केबलद्वारे टाकण्याची योजना महावितरणने करायला हवी ती का केलेली नाही हे कळत नाही. शासनाला तसा प्रस्ताव महावितरणच्या अधिकार्‍यांकडून यायला हवा होता. तो त्यांनी दिलेला नाही. तसा प्रस्ताव शासनाला दिलेला असेल तर तो प्रस्ताव मंजूर करवून घेण्याची जबाबदारी स्थानिक अधिकार्‍यांचीच होय. यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलनही करण्यात आले होते. तशा आशयाचे निवेदन त्यावेळी मनसेतर्फे महावितरणला देण्यात आले होते. तथापि मनसेच्या निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली असल्याचे कळते.
जळगाव महावितरणच्या विजवाहिन्या कशा काय तुटतात हे कळत नाही. पावसाळ्यापुर्वी महावितरणच्या वतीने तासन्तास लोडशेडिंग केले जाते. विचारले तर काम चालू असल्याचे उत्तर मिळते. एवढे होऊनही जर अशा तारा तुटून जीव जात असेल तर महावितरणच्या भोंगळ कारभाराची शासनाने दखल घेणे आवश्यक आहे. जळगाव शहरात मेहरुण, पांडे डेअरी चौक, पिंप्राळा रस्ता, कांचननगर, गेंदालाल मिल व शिवाजी नगर भागातील लोंबकळणार्‍या तारा पाहिल्या की, या तारा नागरिकांच्या जिवावरच उठल्या आहेत असे म्हणावे लागेल. या लोंबकळणार्‍या तारा महावितरणने हटविल्या पाहिजेत. तसेच आकडेधारकांवर कारवाई करावी, ही वारंवार जनतेकडून मागणी केली जातेच परंतु ती केली जात नाही. आता जळगावकर नागरिक म्हणायला लागले आहेत की, महावितरणपेक्षा क्रॉम्प्टनची सेवा बरी होती. तेव्हा महावितरणने नागरिकांच्या भावनांची दखल घ्यावी, हीच अपेक्षा.
महावितरणच्या यु.बी. खंडारे या अभियंत्याच्या मनमानी कारभारामुळेच ही दुर्घटना घडली असा त्यांचेवर आरोप होतोय. एका व्यक्तीसाठी खंडारे यांनी खाजगी जागेतून स्वतंत्र विज वाहिनीची व्यवस्था केली असल्याचा आरोप खंडारेंवर होतोय. या प्रकारची वरिष्ठ पातळीवरुन चौकशी झाली पाहिजे. कारण ही विज वाहिनीच मुळात नियमबाह्य असल्याचे सांगण्यात येते. असे जर असेल तर ही बाब गंभीर आहे. खंडारे यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी ही वाहिनी टाकली असेल आणि त्यामुळे ती विज वाहिनी नागरिकांच्या जिवावर उठत असेल तर या गैरव्यवहाराची त्वरीत चौकशी व्हावी. त्यातून सत्य बाहेर येईल. महावितरणचे मुख्य अभियंता दीपककुमार कुमठेकर यांनी जी सारवासारव केली आहे. ते मनाला पटणारे नाही. वीज वाहिनी तुटलेलीच नाही. वीज तारांमुळे ही आग लागलेलीच नसल्याची काही प्रत्यक्षदर्शींकडून ही माहिती मिळाली. तरीसुद्धा सोमवारी महावितरणच्या अधिकार्‍यांच्या अधिकार्‍यांच्या पथकाकडून घटनास्थळी जाऊन पहाणी करतील. मुख्य अभियंता कुमठेकर यांचे म्हणणे म्हणजे महावितरणच्या गलथान कारभाराची सारवासारव करण्याचा प्रकार म्हणता येईल. महावितरणमुळे लागोपाठ ज्या घटना घडताहेत त्या संदर्भात महावितरणची प्रतिमा डागाळू नये म्हणून मुख्य अभियंत्याने महावितरणची बाजू घेताहेत असाच त्याचा अर्थ होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.