आर्थिकशिस्त नसल्याने जळगावच्या विकासाचे व्हिजन कोलमडले!

0
  • स्वयंपूर्ण गाव त्यात असावा सकारात्मकतेचा भाव : लोकचर्चेत मान्यवरांचे मत
  • दबावगट असणे आवश्यक
  • स्विकृत व्यक्ती तज्ज्ञ असावी
  • विकासाचे व्हिजन महत्त्वपूर्ण
    जळगाव, दि. 3 –
    जळगाव हे स्वयंपूर्ण गाव असून येथे 21 व्या शतकातही मुलभूत सुविधा देण्यावर भर नसल्याने विकासापासून कोसो दूर केले आहे. स्वयंपूर्ण गावात विकासासाठी सकारात्मकतेचा भाव असावा अशी माफक अपेक्षा मान्यवरांनी लोकचर्चेच्या माध्यमातून व्यक्त केली.
    महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने आयोजित लोकचर्चेत प्रसिद्ध वकील सुशिल अत्रे, आर्किटेक शिरीष बर्वे, विचारवंत शंभू पाटील, सीए अनिल शहा यांनी सहभाग घेतला. संचालक राजेश यावलकर, सल्लागार संपादक धों.ज. गुरव यावेळी उपस्थित होते.
    माझ्या स्वप्नातील जळगाव या विषयावर बोलतांना मान्यवरांनी विविध विषयांची उकल केली. अ‍ॅड. सुशिल अत्रे म्हणाले, प्रत्येक्षातील गाव आणि स्वप्नातील गाव यात फरक आहे, स्वप्नातील गाव एकसारखे असू शकते, प्रत्येक गाव आदर्शवत असावे; तेथे पाणी, गटारी, वीज, आरोग्य या भौतिक व प्राथमिक सुविधा देण्यावर भर दिला पाहिजे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या भूमिकेतून विकासाचे व्हिजन आखले गेले पाहिजे. रोजगाराच्या निमित्ताने परगावी गेलेले लोक पुन्हा गावात आले पाहिजे असेही ते म्हणाले. मतदान हे आपले कर्तव्य आहे हे सांगण्यासाठी आपल्याला एखाद्या सिनेकलावंतांची आवश्यकता भासते हेच मुळात चुकीचे आहे. वेगळ्या पद्धतीने मतदानाचे आमंत्रण मिळाल्याशिवाय मतदार जात नसल्याने सुविधांची वानवा झाली आहे. राजकारण्यांची गोष्ट सांगण्याची एक आणि प्रत्येक्षात वेगळी असते. स्विकृत नगरसेवक घेतांना त्यात तज्ज्ञ, नामवंत व्यक्तींचा समावेश महत्त्वाचा आहे, मात्र असे होत नाही. नाराज व्यक्तींची तेथे वर्णी लागते हे चुकीचेच होत आहे.
    शिरीष बर्वे म्हणाले की, मी या शहराकडे सकारात्मकतेने पाहत आहे. सुंदर, आखीव-रेखीव, स्वच्छ आणि स्वयंभू असे हे गाव आहे. औद्योगिक क्षेत्रात हवे तसे बदल होत नसले तरी येथील औद्योगिक क्षेत्र स्वयंभू आहे. कृषी क्षेत्रावर या शहराची आर्थिक स्थिती अवलंबून आहे. बेरोजगारीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या लोकांना येथेच रोजगार मिळाला पाहिजे, त्या दृष्टीने पाऊल उचलने आवश्यक झालेले आहे. जनतेच्या भावनांचा विचार करुन राजकारण्यांनी कृती करणे अपेक्षित आहे. शहरातील दोन उद्यानांची रचना बदलली त्यामुळे नागरिकांचा विचार बदलला, सकारात्मकता बदलली आहे. या ठिकाणांहून भावनिक देवाण-घेवाण होत असते. इंदौर शहर स्वच्छ झाले मग जळगाव का होणार नाही हा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक झाले आहे. राजकारण्यांना समाजकार्यासाठी वेळच नसल्याने मुलभूत प्रश्‍न गंभीर होत आहेत.
    शंभू पाटील म्हणाले, जळगाव हे सुंदर गाव आहेच, येथे विविध बोलीभाषांची मांदीयाळी असून सर्वसमावेशक शहर आहे. आपल्या वैशिष्ट्यांसह शहर अस्तित्व टिकवून आहे. अवघ्या दहा मिनिटात एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोहचता येते, हे स्मार्टसिटीचे लक्षण आहे. उत्तम शेती असल्याने येथे रोजगाराच्या संधी आहे, मात्र औद्योगिक क्षेत्रात रोजगाराच्या संधी नसल्याने बाहेरगावाला तरुण प्राधान्य देत आहेत. गावे ओस पडली असून शहरात गर्दी वाढली आहे. शहरे फक्त पैसा देणारी होत आहेत, राहण्यायोग्य शहर, रोजगाराच्या संधी हे आव्हान ठरत आहे. श्रीमंत लोकांची गरीब मनपा अशी ओळख शहराची झाली आहे. लोकांचे प्रश्‍न, भावना यांचा दुवा म्हणून नगरसेवकांनी काम केले पाहिजे, मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. गोंधळाचे प्रतिबिंब म्हणजे राजकारण असे झाले आहे. छोटे-छोटे प्रश्‍न न्यायालयात जात असल्याने लोकप्रतिनिधींची आवश्यकताच का पडावी? असाही प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.
    अनिल शहा म्हणाले की, 1986 मध्ये मी अमेरीकेला डावलून जळगावात स्थायिक झालो. एक प्रगतीचे शहर म्हणून जळगावकडे पाहण्याचा सुरुवातीपासून दृष्टीकोन आहे. मात्र येथील मुलभूत सुविधांच्या बाबतीत लक्ष दिले जात नाही. औद्योगिक क्षेत्रात असलेल्या संधी संपुष्टात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा उद्योग केंद्रात एकाही कंपनीची नोंदणी झाली नाही हे धोकदायक आहे. जळगावात रोजगार उपलब्ध नसल्याने लोंढे अन्य शहरांकडे जात आहेत. स्थानिक रोजगार वाढला तर विकासाला हातभार लागणार आहे, औद्योगिक क्षेत्राला चालना देणे आवश्यक झाले आहे. शहरातील उद्याने, सिनेमागृह उत्तम दर्जाची हवीत त्यातून सांस्कृतिक भुक भागविली जाते. पाणी, स्वच्छता, आरोग्य, रस्ते या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे. शहराच्या विकासासाठी एकावर अवलंबून न राहता सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. शहरातील दाळ उद्योगाला दळणवळणाच्या नियमात झालेल्या बदलामुळे फटका बसला तरीही ते उद्योग तग धरुन आहेत, मंदीमुळे एखादा उद्योग बंद पडला असे शहरात झाले नाही; यावरुन औद्योगिक क्षेत्र सुदृढ असल्याचे सिद्ध होते. शहराच्या विकासाचे व्हिजन प्रत्यक्षात आणण्यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे झाले आहे. कुणालातरी यासाठी बलिदान करावे लागणार आहे. पुढच्या पिढीसाठी काहीतरी करायचे असेल तर सर्वांनीच सकारात्मक विचार घेवून पुढे आले पाहिजे. सत्याचा कधीतरी विजय होईल या उक्तीने काम करणे महत्त्वाचे झाल्याचे श्री. शहा म्हणाले.
    … मग तुमची काय गरज?
    नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात देखील सत्ताधार्‍यांनी लक्ष दिले नाही. शहरातील छोटे-छोटे प्रश्‍न न्यायालयाच्या कचाट्यात सापडले आहे. हे प्रश्‍नच लोकप्रतिनिधींकडून सुटत नसतील तर त्यांची गरज तरी काय? प्रशासन आणि न्यायालयच लक्ष देत असेल तर लोकप्रतिनिधींचा उपयोग तरी काय असा प्रश्‍न उपस्थित झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.