मराठी शाळेंच्या विद्यार्थी संख्यावाढीसाठी शिक्षण विभागाचे दौरे

0

जळगाव, दि.13 –
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमधील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली असून मराठी शाळांना अस्तित्व टिकवीणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता शाळांना सुट्टी लागल्यानंतर शिक्षण समिती सभापती, शिक्षणाधिकारी यांच्यासह एक पथक नेमण्यात येणार असून हे पथक संपूर्ण जिल्ह्यात तालुकानिहाय दौरे करणार आहे. या दौर्यात गावोगावी जाऊन पालकांना आपल्या पाल्यांना मराठी शाळेत शिकण्यासाठी टाकण्याबाबत आवाहन करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण समिती सभापती पोपट भोळे यांनी दिली.
शुक्रवारी 13 रोजी शिक्षण समितीची या शैक्षणिक वर्षातील शेवटची सभा झाली, यात हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली.
अंगणवाडीकडून यादी मागविणार
अंगणवाडीकडून बालकांची यादी मागविण्यात येणार आहे. अंगणवाडीनंतर किती मुल जिल्हा परिषदेच्या शाळेत गेली व किती मुल खाजगी शाळेत गेली याची माहिती घेतली जाणार आहे. सुट्टीच्या काळात शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिक्षण समिती सभेत किती शिक्षक खाजगी शिकवणी घेतात याची माहिती मागविण्यात आली आहे. जर एखादा शिक्षक मराठी शाळा सुटल्यानंतर खाजगी शिकवणी घेत असेल तर अशा शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पॅडमॅन चित्रपट दाखवावा
मासिक पाळीवर आधारीत पॅडमॅन चित्रपटामुळे मासिक पाळीदरम्यान घ्यावयाच्या काळजीबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असून प्रत्येक तालुक्यात हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तसेच राज्य शासन अस्मिता योजना राबवित असून त्यांचा लाभ प्रत्येक मुलींना, महिलांना देण्याबाबत जनजागृती करण्याबाबत यावेळी सुचना देण्यात आल्या. दरम्यान शिक्षण समितीच्या बैठकीत विविध कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.