मराठा आरक्षणावर १५ जुलैला अंतरिम आदेशासाठी सुनावणी : सर्वोच्च न्यायालय

0

नवी दिल्ली : मराठा आरक्षण व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या संदर्भातील याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावरील अंतरिम आदेशासाठी सुनावणी १५ जुलै रोजी करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने सांगितले आहे.

मराठा आरक्षणाच्या विरोधात जयश्री पाटील यांची मूळ याचिका असून मराठा आरक्षण चळवळीतले कार्यकर्ते विनोद पाटील यांनी हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्यात यावं अशी मागणी केली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. तसेच वैद्यकीय पदव्युत्तर परीक्षा अभ्यासक्रमासंदर्भातील याचिकांवरील आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रक्रिया येत्या ३० जुलैपर्यंत संपत आहे. त्यामुळे त्याच्या आधीच सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल अशी शक्यता आहे.

राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गासाठी (मराठा समाज) शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण लागू करण्याकरिता विधिमंडळाने विधेयक संमत केले. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

१ डिसेंबर २०१८ पासून राज्यात मराठा आरक्षण विधेयक लागू झाले. तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १६ टक्के आरक्षण देण्याची तरतूद मराठा आरक्षण विधेयकात केली. यामध्ये ओबीसी समाजाला कोणताही धक्का न लावता एसईबीसी या विशेष प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं.

Leave A Reply

Your email address will not be published.