मनपाच्या महासभेत भाजप-शिवसेनेचे नगरसेवक आमनेसामने, प्रचंड गदारोळ

0

जळगाव प्रतिनिधी : जळगाव महापालिकेची आज बुधवारी ऑनलाईन महासभा पार पडली. जळगावात महापौर निवडणुकीनंतर पहिल्याच महासभेत भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये मोठा वाद झाला. महासभा ऑनलाईन असताना बहुमत कसे सिद्ध केले? असा जाब विचारत भाजपचे काही सदस्य थेट सभागृहात दाखल झाले. यावेळी दोन्ही पक्षातील सदस्य आक्रमक झाल्याने जोरदार गोंधळ उडाला. महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली ही महासभा पार पडत होती. व्यासपीठावर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित आहेत.

दरम्यान, सभेत या महासभेत महापालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील मुदत संपलेल्या गाळ्यांबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत निर्णय झाला. तसेच शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनी आणि महापालिका प्रशासनात लवाद नेमण्याच्या विषयावरून भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

महासभेत गाळ्यांचा विषय बहुमताने मंजूर झाल्यानंतर भाजपचे गटनेते भगत बालाणी, सदस्य कैलास सोनवणे, अॅड. शुचिता हाडा, विशाल त्रिपाठी, धीरज सोनवणे यांनी ऑनलाईन पद्धतीने विरोध नोंदवण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळात हा विषय मंजूर झाला. त्यानंतर लवाद नेमण्याचा विषय नगरसचिव गोराणे यांनी वाचायला घेतला. हा विषय देखील बहुमताने मंजूर होत असल्याने भाजपचे सदस्य आक्रमक झाले.

त्यानंतर भाजपचे सदस्य कैलास सोनवणे, भगत बालाणी, धीरज सोनवणे आदी थेट सभागृहात दाखल झाले. त्यांनी हे दोन्ही विषय बहुमतांवर मंजूर केल्याबाबत आक्षेप घेतला. शिवसेनेने बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर दोन्ही पक्षाच्या सदस्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने वाद झाला

Leave A Reply

Your email address will not be published.