मध्य प्रदेशात कॉंग्रेसचे टेन्शन वाढणार ; आणखी 20 आमदार कॉंग्रेस सोडण्याच्या तयारीत

0

बंगळूर : मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर आज पडदा पडेल का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बहुमत चाचणीवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत असून दुसरीकडे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना बहुमत चाचणीला आज सामोरे जाण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान,  आणखी 20 आमदार सत्तारूढ कॉंग्रेस सोडण्याच्या तयारीत असल्याचा सनसनाटी दावा त्या पक्षाच्या बंडखोरांनी मंगळवारी केला. त्यामुळे तेथील सरकार वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या कॉंग्रेसचे टेन्शन वाढणार आहे.

प्रभावी तरूण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी अलिकडेच कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे समर्थक असणाऱ्या मध्यप्रदेशातील कॉंग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामे दिले. त्या बंडामुळे त्या राज्यातील कॉंग्रेस सरकारचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. बंडखोर आमदारांनी भाजपची सत्ता असणाऱ्या कर्नाटकमधील बंगळूरनजीकच्या रिसॉर्टमध्ये काही दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. त्यांना भाजपने ओलीस ठेवल्याचा आरोप कॉंग्रेसकडून केला जात आहे. मात्र, तो आरोप येथे प्रथमच पत्रकारांशी बोलताना बंडखोर आमदारांनी फेटाळून लावला. आम्ही स्वेच्छेने बंगळूरमध्ये आलो, असा दावा त्यांनी केला.

ज्योतिरादित्य हेच आमचे नेते आहेत. त्यांच्यामुळे आम्ही राजकारणात आहोत. त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले नाही. तरीही आम्ही स्वस्थ बसलो. मुख्यमंत्री बनलेल्या कमल नाथ यांनी आमच्या विधानसभा मतदारसंघांना निधी देण्याविषयी टाळाटाळ सुरू केली. आमचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठीही नाथ यांच्याकडे वेळ नव्हता. आम्ही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचीही भेट घेतली. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही, असे बंडखोर आमदारांनी म्हटले. आगामी काळात भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.