मकरसंक्रांतीचे पर्व; आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवावा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारत देश हा विविधतेत एकता असणारा देश आहे. भारतात राहणारे विविध धर्माचे लोक प्रत्येक उत्सव एकत्र येवून साजरे करतात. या उत्सवांपैकी एक म्हणजे मकर संक्रांती या सणाला हिंदू धार्मिक संस्कृतीनुसार अगाध महत्व आहे. तसेच काही सणांना शास्त्रीय दृष्टीकोनातून पहिले जाते. मकर संक्रांती हा हिंदू धर्माचा प्रमुख सण आहे. जो सूर्य प्रकाशात चढतांना साजरा केला जातो.मकरसंक्रातीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हिंदु धर्मात संक्रांतीला देव मानले आहे. भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जण ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो.या दिवशी इतरांना तीळगूळ देण्यापूर्वी देवाच्या समोर ठेवावा. त्यामुळे तीळगुळातील शक्ती आणि चैतन्य टिकून रहाते. तीळगूळ देतांना आपल्यात चैतन्य आणि वेगळाच भाव जागृत होतो. व्यावहारिक स्तरावरील जिवाला घरात असलेल्या वातावरणातील चैतन्याचा लाभ होतो. त्याच्यातील प्रेमभाव वाढतो. त्याला नकारात्मक दृष्टीकोनातून सकारात्मक दृष्टीकोनात जाण्यास साहाय्य होते.

तीळगुळाचे महत्त्व

तिळामध्ये सत्त्वलहरींचे ग्रहण अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्यामुळे तीळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्वी होऊन साधना चांगली होते.

साधनेच्या दृष्टीने मकरसंक्रांतीचे महत्त्व

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचे वातावरण जास्त चैतन्यमय असते. साधना करणाऱ्या जिवाला या चैतन्याचा सर्वाधिक लाभ होतो. या चैतन्यामुळे त्या जिवातील तेजतत्त्व वृद्धींगत व्हायला साहाय्य होते. या दिवशी प्रत्येक जिवाने वातावरणातील रज – तम वाढू न देता अधिकाधिक सात्विकता निर्माण करून त्या चैतन्याचा लाभ करून घ्यावा. मकरसंक्रांतीचा दिवस साधनेसाठी अनुकूल आहे. त्यामुळे या काळात अधिकाधिक प्रमाणात साधना करून ईश्वर आणि गुरु यांच्याकडून चैतन्य मिळवण्याचा प्रयत्न करा.

प्रकाशमय कालावधी

या दिवशी यज्ञात हवन केलेली द्रव्ये ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर देव अवतरित होतात. याच प्रकाशमय मार्गाने पुण्यात्मा पुरुष शरीर सोडून स्वर्गादी लोकी प्रवेश करतात. म्हणून हा कालावधी प्रकाशमय मानला गेला आहे.

महादेवाला तीळ – तांदूळ अर्पण करावे

या दिवशी महादेवाला तीळ – तांदूळ अर्पण करावे अथवा तीळ – तांदूळ मिश्रित अर्घ्य अर्पण करण्याचेही विधान आहे. या पर्वाच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. तिळाचे उटणे, तीळमिश्रित पाण्याचे स्नान, तीळमिश्रित पाणी पिणे, तिळाचे हवन करणे, स्वयंपाकात तिळाचा वापर तसेच तिळाचे दान हे सर्व पापनाशक प्रयोग आहेत. म्हणून या दिवशी तीळ, गूळ, तसेच साखरमिश्रित लाडू खाण्याचे तसेच दान करण्याचे अपार महत्त्व आहे. ‘जीवनात सम्यक् क्रांती आणणे’, हे मकरसंक्रांतीचे आध्यात्मिक तात्पर्य आहे.

मकरसंक्रांतीला दानाचे महत्त्व

हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप तसेच धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे. या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभरपटीने प्राप्त होते. या दिवशी दान केल्याने सूर्यदेव आनंदीत होतात.

प्राकृतिक उत्सव

हा प्राकृतिक उत्सव आहे, प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव आहे. दक्षिण भारतात हे पर्व ‘थई पोंगल’ नावाने ओळखला जातो. सिंधी लोक या पर्वाला ‘तिरमौरी’ म्हणतात. महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिक ‘मकरसंक्रांती’ म्हणतात आणि गुजरातमध्ये हे पर्व ‘उत्तरायण’ नावाने ओळखले जाते. देशात विविध प्रांतात मकर संक्रांति सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकमध्ये या सणाला संक्रांति या नावाने संबोधले जाते. पंजाब आणि हरियाणामध्ये हा सण नवीन पिकाच्या स्वागतासाठी साजरा केला जातो. तर आसाम मध्ये हा सण बिहुच्या रुपात साजरा केला जातो.

वाणाचे महत्व

भारत देशाची संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. मकर संक्रांति दिवशी सगळ्या स्त्रिया आपल्या शेतामध्ये व मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना देतात. देवाला तांदूळ, तीळ अर्पण करून सौभाग्याचे वाण लुटतात. थंडीच्या काळामध्ये तिळाचे भरपूर महत्व समजले जाते. थंडीच्या दिवसात तीळ खाल्याने अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी सहायता होते. तसेच या दिवशी स्त्रिया एका सुगडात हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओम्बी आणि तीळ इ. वस्तू सुगडात भरून देवाला अर्पण करतात. याशिवाय तीळ आणि गूळ लाडू हे पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्रात मकर संक्राति हा सॅन तीन दिवस साजरा केला जातो.

नवविवाहित स्त्रियांसाठी विशेष महत्त्व

संक्रांतीच्या दिवशी विवाहित स्त्रिया हळदी – कुंकू करतात आणि वाण वाटून ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे सांगून शुभकामना देतात. नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणाऱ्या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळया रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. त्यांना हलव्याचे दागिने घालतात व सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात. त्यांना तिळगुळाच्या वड्या किंवा तीळ आणि साखरेपासून बनविलेला हलवा देतात. निरांजन, स्टीलच्या लहान डब्या, पिशव्या वगैरेंसारखी एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला ‘आवा लुटणे’ असे म्हणतात.उत्तर गोलार्धात राहणाऱ्या भारतीयांना सूर्याच्या उत्तरायणामध्ये झालेल्या संक्रमणामुळे त्यांना अधिक प्रकाश आणि उष्णतेचा लाभ मिळतो. मकर संक्रातीच्या आदल्या दिवशी भोगी आणि दुसऱ्या दिवशी कंक्रांत साजरी केली जाते. स्त्रिया मातीच्या घटाचे दान देतात.

अनेक यात्रांचे आयोजन

मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक यात्रा आयोजित केल्या जातात. यामध्ये सर्वात प्रमुख म्हणजे कुंभमेळा. हा कुंभमेळा दर १२ वर्षांनी नाशिक, हरिद्वार, प्रयाग आणि उज्जैन इ. जागी चक्राकार पद्धतीने आयोजित केला जातो. यादिवशी यात्रेकरू पवित्र नद्यामध्ये स्नान करतात.मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे. यादिवशी आकाशात वेगवेगळ्या रंगाचे पतंग उडताना दिसतात. मकरसंक्रांत म्हणजे खालून वर चढण्याचा उत्सव, म्हणून तो महत्त्वाचा मानला आहे. पृथ्वीच्या सूर्याजवळ आणि सूर्यापासून दूर जाण्याचा जसा सूर्यावर काहीच परिणाम होत नाही तसेच मानवाने त्याच्या जीवनात येणाऱ्या चढउतारांकडे, सुख – दुःखांकडे समत्व दृष्टीने, साक्षीभावाने पहायला हवे, असाच संदेश मिळतो.

विसरूनी सर्व कटुता … हृदयात तिळगुळाचा गोडवा यावा … दुःख हरावी सारी, अन् आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा…”मकर संक्रांती निमित्त सर्वांना दैनिक लोकशाही ~ लोकलाईव्ह कडून मंगलमय शुभेच्छा..

 

 – शब्दांकन कविता ठाकरे

Leave A Reply

Your email address will not be published.