मंदिरं खुले करण्यासाठी खंडोबा महाराज मंदिर फैजपूर येथे घंटानाद आंदोलन

0

 

फैजपूर (प्रतिनिधी) :मंदिरं बंद उघडले बार अशी जोरदार घोषणाबाजी करत खान्देश नारीशक्ती गृप व जनसंघ परिवारातर्फे फैजपूर येथे सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्या नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करण्यात आले.राज्यभरातील मंदिरे उघडण्यात यावीत,या प्रमुख मागणीसाठी आज भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीकडून संपूर्ण राज्यात घंटानाद आंदोलन करण्यात आले. भाजपच्या या आंदोलनाला विविध धार्मिक, सामाजिक संघटनांच्या वतीने पाठींबा देण्यात आला आहे.

याचाच एक भाग म्हणून खान्देश नारीशक्ती गृप व जनसंघ परिवाराने देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी फैजपूर येथील ऐतिहासिक खंडेराव महाराज मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केले.मंदिर भाविकांना दर्शनाकरिता खुले करण्यासाठी राज्य सरकार चालढकल करीत असल्याने राज्य सरकारच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे अनेक धार्मिक, सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. दरम्यान, कोरोनामुळे सात महिन्यांपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता.परंतु,केंद्र सरकारच्या निर्देशा नुसार राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता प्रदान करण्यास सुरुवात केली आहे. अनलॉकच्या चौथ्या टप्प्यापर्यंत बऱ्याचशा गोष्टींमध्ये अटी व शर्तींच्या अधीन राहून सूट मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील सर्व मंदिरे देखील उघडण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी धार्मिक संघटना तसेच जनतेकडून केली जात आहे. एकीकडे राज्य सरकार दारूची दुकाने,बार उघडण्यास परवानगी देत आहे.

मात्र, मंदिरे उघडण्यास नकार देणे योग्य नाही. मंदिरे बंद असल्याने मंदिर परिसरातील अनेक व्यावसायिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे.तसेच मंदिर हा आपल्या भारतीय संस्कृतीचा,आस्थेचा विषय असून कोरोना संसर्गाच्या काळात इतर गोष्टींप्रमाणे नियम व अटी लागू करत राज्य सरकारने मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे यांनी केली.याप्रसंगी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे, जनसंघाचे प्रदेश उपाध्यक्ष संदिप पाटील,भाजप मा.शहराध्यक्ष युवराज चौधरी,पंकज पाटील, देवेंद्र झोपे,सौ.भारती पाटील,सौ.रुपाली चौधरी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.