भुसावळात शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे दोन लाख लुटीचा प्रयत्न फसला

0

भुसावळ (प्रतिनिधी) : वराडसीम येथून शहरातील बँकेत दोन लाख रुपयांचा भरणा करण्यासाठी आलेल्या एका ज्येष्ठ नागरीकाच्या हातातील पिशवी ओढणार्‍या चार ते पाच टवाळखोरांना रस्त्याने जाणार्‍या एका शिक्षिकेने चांगलाच इंगा दाखवत धडा शिकवला. या शिक्षिका वेळीच  ज्येष्ठाच्या मदतीसाठी धावून आल्यामुळे त्यांचे पैसे  वाचलेच व पुढील अनर्थ टळला.

शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जामनेर रोडवर हा प्रकार घडला. शनिवारी दुपारी वराडसिम येथील एक वयोवृद्ध व्यक्ती शहरातील बँकेत दोन लाख रुपये भरण्यासाठी जात होते. निर्मनुष्य जामनेर रोडवरून पायी जाताना, चार ते पाच अनोळखी संशयीतांनी त्यांची रोकड हिसकावण्याचा प्रयत्न केला. ही झटापट सुरू असताना फैजपूर येथील कुसूमताई विद्यालयाच्या शिक्षिका विशाखा सुनील शिंदे (रा.गडकरी नगर, भुसावळ)  या तेथून जात असतांना हा प्रकार बघितला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावताभीती न बाळगता अतिशय  धाडसाने  गृहस्थाच्या मदतीसाठी धावल्या व  रोकड हिसकावणार्‍यांवर तूटून पडल्या.     ते चार पांच जण असले तरी  ज्येष्ठांपासून लांब ढकलत त्यांनी चापटा-बुक्क्यांनी सुद्धा मारले . त्यामुळे संशयितांनी तेथून पळ काढला.

घटनेनंतर शिंदे यांनी ज्येष्ठाला पाणी दिले. तसेच त्यांच्या मुलास फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक लागलीच मुलासोबत घरी गेले. त्यामुळे त्यांचे नाव कळू शकले नाही. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरातील ज्येष्ठांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आला आहेत.  दरम्यान, शहरात घडलेल्या या घटनेची पोलिसांत नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.