खुशखबर : मान्सून 21 मे पर्यंत अंदमान बेटावर धडकणार

0

मुंबई : भारताच्या पश्चिम किनारपट्टीला नुकताच तोक्ते चक्रीवादळाचा  फटका बसलेला आहे. तेवढ्यातच आता भारतीय नागरिकांना दिलासा देणारी गोष्ट समोर आली आहे. नैऋत्य मोसमी वारे पुढील तीन दिवसात 21 मे म्हणजेच शुक्रवारपर्यंत अंदमान बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे. याशिवाय यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र तयार होईल, असा अंदाज देखील हवामान विभागनं वर्तवला आहे.

नैऋत्य मोसमी वाऱ्यांना भारतीय उपखंडात मान्सून म्हटलं जातं. भारतीय हवामान विभागानं हे वारे 1 जूनला केरळमधील दाखल होतील, असा अंदाज वर्तवला आहे. सध्या हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 21 जुलैला नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मान्सून 1 जूनला केरळमध्ये

यंदा मान्सून 1 जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळात मान्सून दाखल होईल. तर 10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  गेल्या दोन वर्षात अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे केरळात जर मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.