भारतात २१ जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार

0

पुणे : भारतात येत्या 21 जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. भारताच्या उत्तर भागात काही ठिकाणी राजस्थान, हरयाणा आणि उत्तराखंडमध्ये काही भागात सकाळी कंकणाकृती ग्रहण दिसणार आहे. देशात इतर ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहतायेणार आहे.  भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9 वाजून 16 मिनिटांनी ग्रहणाचे वेध सुरू होतील. 10 वाजून 19 मिनिटांनी कंकणाकृती ग्रहणाला सुरुवात होईल. कंकणाकृती ग्रहण दुपारी 2 वाजून 2 मिनिटांनी सुटेल तर खंडग्रास ग्रहण दुपारी 3 वाजून 4 मिनिटांनी सुटेल. कंकणाकृती ग्रहण सुरू असताना भारतात सूर्याचा 98.6 % भाग चंद्रामुळे झाकला जाईल. डेहराडून, कुरुक्षेत्र, चामोली, जोशीमठ, सिरसा, सुरतगड अशा काही ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. तर मुंबई, दिल्लीत खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. ग्रहणादरम्यान दिल्लीमध्ये सूर्याचा सुमारे 94% भाग, गुवाहाटीमध्ये 80 %, पाटणा येथे 78%,  सिलचर येथे 75%, कोलकाता येथे 66%, मुंबईमध्ये 62 टक्के, बंगळुरूमध्ये 37% , चेन्नई मध्ये 34 टक्के तर पोर्ट ब्लेअर येथे 28% भाग चंद्रामुळे झाकला जाणार आहे.

महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे जिल्ह्यात १० ते १०:३० च्या दरम्यान ग्रहणाला सुरुवात होणार असून ११ ते १२ च्या दरम्यान सूर्याचा ५०% पेक्षा जास्त भाग झाकला जाईल. तर १ ते १:३० च्या दरम्यान ग्रहणाचा शेवट होईल. जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत असतात. तेव्हा सूर्यग्रहण दिसते, सूर्यग्रहण अमावस्येच्या दिवशी दिसते. जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये येऊन सूर्याला झाकतो, मात्र लहान आकारामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही, तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण दिसते. अशा वेळी चंद्र सूर्याच्या मध्यभागी दिसतो आणि सूर्याच्या बाह्याकाराचे कंकण दिसू लागते.

कंकणाकृती सूर्यग्रहण हे जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा दिसते. या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडी चंद्राच्या पाठीमागे दिसते. सूर्यग्रहण पाहण्यासाठी कायम सुरक्षित पद्धतींचाच वापर करावा जेणेकरून सूर्याकडून येणाऱ्या प्रखर आणि अतिनील किरणांमुळे (अल्ट्रा व्हायोलेट) डोळ्यांना इजा होऊ नये याची काळजी घेऊनच हे ग्रहण पाहावे. ते शक्यतो उघड्या डोळ्यांनी पाहणे टाळावे.

Leave A Reply

Your email address will not be published.