भाजप-शिवसेना युतीची घोषणा आज वा उद्या?

0

मुंबई : दिल्लीतील भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर रविवारी भाजप-शिवसेना यांच्यातील युतीवर शिक्कामोर्तब झाले असून, आज, सोमवारी वा उद्या मंगळवारी युतीची घोषणा होणार असल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेला १२० जागाच देण्यावर अडून बसलेल्या भाजपने ऐनवेळी ‘मित्रपक्षा’च्या जागांमध्ये पाच-सहा जागांची वाढ करीत युतीचा निर्णय घेतल्याचे कळते.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रविवारी सायंकाळी पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात झाली. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी उपस्थित होते.

या बैठकीत युतीबाबत चर्चा झाली. आज किंवा उद्या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. युतीबाबतचा निर्णय मुंबईतच जाहीर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेचा आग्रह आहे. मात्र, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबत बैठकीत कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीवर प्रश्नचिन्ह कायम आहे. विधानसभा निवडणूक स्वबळावर लढल्यास भाजपला किमान १६० जागा मिळतील असा जनमत चाचण्यांचा अंदाज आहे. तरीही शिवसेनेसोबतची युती तोडता कामा नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने भूमिका घेतल्याचे कळते.

सेनेकडून एबी फॉर्मचे वाटप

रविवारी घटस्थापनेच्या दिवशी शिवसेनेने उमेदवारी निश्चित असलेल्या आणि जागांचा वाद नसलेल्या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केल्याचे कळते. त्यांच्यात मुंबईतील सुनील प्रभू आणि अजय चौधरी, पुण्यातील विजय शिवतारे, सिन्नरमधील राजाभाऊ वाजे, मालेगावचे दादा भुसे, निफाडचे अनिल कदम, देवळालीचे योगेश घोलप, संजय घाटगे (कागल), संग्रामसिंह कुपेकर (चंदगड), राजेश क्षीरसागर (कोल्हापूर उत्तर), चंद्रदीप नरके (करवीर), डॉ. सुजित मिचणेकर (हातकणंगले), सत्यजीत पाटील (शाहूवाडी), प्रकाश आबिटकर (राधानगरी), उल्हास पाटील (शिरोळ) यांचा समावेश आहे. औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघातून संजय शिरसाट, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना पुन्हा संधी देण्यात आल्याचेही कळते.

Leave A Reply

Your email address will not be published.