बॉक्सिंग प्रशिक्षकासह खेळाडूंनी अर्ज करण्याचे आवाहन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जिल्हास्तरीय खेलो इंडिया केंद्र, जळगाव अंतर्गत बॉक्सिंग खेळाच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक व खेळाडूंची निवड करण्याकरीता अर्ज मागविण्यात आले आहेत.

देशात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार व्हावेत म्हणून केंद्र सरकार व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने खेलो इंडिया सेंटरअंतर्गत जिल्ह्यात क्रीडा केंद्र मंजूर केले आहे. त्याअनुषंगाने जळगाव जिल्ह्यात बॉक्सिंग या खेळाकरीता श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे.

बॉक्सिंग या खेळाच्या प्रशिक्षण केंद्राकरीता माजी सर्वोत्कृष्ट खेळाडू, अतिउच्च कामगीरी/गुणवत्ता प्रमाणपत्र/अनुभव असलेला 1 क्रीडा प्रशिक्षकाची नियुक्ती बॉक्सिंग या खेळाचे प्रशिक्षण देण्याकरीता करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशिक्षकाचे वय 18 ते 45 वर्षे वयोगटातील असावे.

त्याचबरोबर 30 खेळाडू प्रशिक्षणार्थीची निवड त्यांनी संपादन केलेल्या बॉक्सिंग या खेळाच्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीनुसार करण्यात येणार आहे. खेळाडूचे वय 20 वर्षांआतील असावे. खेळाडूची जन्मतारीख 1 जानेवारी, 2002 नंतरची असावी. इच्छुक पात्रताधारक क्रीडा प्रशिक्षक व खेळाडूंनी आपले अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव यांच्या नावाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव येथे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी व कामकाजाच्या वेळेत 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत सादर करावेत. अर्जासमवेत आधारकार्ड व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित सत्यप्रती जोडाव्यात, असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी मिलिंद दीक्षित यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.