बारावीची आजपासून परीक्षा, जिल्ह्यात 71 केंदे

0

केंद्रचालकासह शिक्षकांना परीक्षा केंद्रात मोबाईल बंदी

जळगांव, दि.20, –
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावीच्या परीक्षा आजपासून तर दहावीच्या मार्चपासून सुरू होत आहेत. बारावीसाठी जिल्हयात 71 केंद्रे असून या परीक्षा अत्यंत पारदर्शी व कॉपीमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी राज्य परीक्षा मंडळा तर्फे कडक सुचना देण्यात आल्या आहेत.वॉटसआपवरून होणारी पेपरफुटी रोखण्यासाठी यंदापासून केंद्रचालकांपासून शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आदी कोणासही परीक्षा केंद्रावर मोबाईल घेऊन जाता येणार नाही अशी माहिती शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग यांनी दिली. बारावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना मोबाईल आणता येणार नाही. त्याचबरोबर शिक्षकांकडील मोबाईल केंद्र संचालकांकडे जमा करावे लागतील. एका दिव्यांग विद्यार्थिनीला वैद्यकीय कारणास्तव आयपॅडवर परीक्षा देण्याची सवलत देण्यात आली आहे. यंदा बारावीच्या परीक्षेत 9 भाषा विषयांसाठी कृतीपत्रिका देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी मंडळाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले व छपाई केलेलेच वेळापत्रक ग्राह्य धरावे असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर,औरंगाबाद,मुंबई,कोल्हापुर,अमरावती,नाशिक,लातूर व कोकण या नऊ मंडळामार्फत बारावी व दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2019 या कालावधीत परीक्षा होणार आहे.या परीक्षेसाठी राज्यभरातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थी नोंदणी झाली आहे.यामध्ये 8 लाख 42 हजार 919 विद्यार्थी तर 6 लाख 48 151 विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत. यामध्ये कला,वाणिज्य,विज्ञान व किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम या सर्व विभागाचे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यात एकूण 9771 कनिष्ठ महाविद्यालयातून या विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात 2957 परीक्षा केंद्रे आहेत. यावर्षी सर्व विभागात विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉलतिकीट मिळणार आहेत. पीसीएमबी अर्थात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र , जीवशास्त्र, गणित या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यात बदल करण्यात आला आहे.

जिल्हयात बारावीची 71 परीक्षा केंद्रे असून 22 परीक्षक केेंद्रे कस्टोडीअन सेंटर आहेत. तसेच 6 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक तालुकास्तरावर तहसिलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचे स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. त्याशिवाय तालका स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांना एक स्वतंत्र पथक गठीत करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. स्थानिक तालुकापातळीवर जे स्थायी स्वरूपात परीक्षा केंद्रांवर दक्षता राखण्याच्या कामी सहाय्य करतील. जिल्हयात उपद्रवी असणार्‍या केंद्रावरील केंद्र संचालकांनी सतर्क राहुन कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडाव्यात यासाठी सहकार्य करावे, अन्यथा होणार्‍या परीणामास ते सर्वस्वी जबाबदार रहातील असे आवाहन करण्यात आले आहे.
डी.पी. महाजन, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग, जिल्हा परीषद जळगांव.

Leave A Reply

Your email address will not be published.