बाजार समितीच्या बनावट पावत्या छापून वापर; दोघांवर गुन्हा दाखल

0

सावदा, ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बनावट पावत्या छापून त्याचा वापर करण्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ पसरली  आहे. या प्रकरणी बाजार समिती सभापती गोपाळ नेमाडे यांच्यासह संचालकांच्या झालेल्या बैठकीत पोलीस स्थानकात तक्रार देण्याचा निर्णय झाला. याप्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून रावेर तालुक्यातून केळीची वाहतूक होते. यासाठी प्रत्येक ट्रककडून बाजार समिती ३०० रूपये शुल्क आकारणी करते. दरम्यान, १२ ऑगस्टला बाजार समितीच्या कर्मचार्‍याने महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवरील चोरवड नाक्यावर एका ट्रक चालकाकडील पावतीची तपासणी केली. मात्र, त्यावर बाजार समितीचा शिक्का नव्हता. यामुळे शंका येताच त्याने ट्रक चालकास पावती कुठून फाडली? अशी विचारणा केली. चालकाने सावद्यातील एकाचे नाव सांगितले. यामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे.

सदर  प्रकरण उघडकीस आल्यानंतर बाजार समिती सभापती गोपाळ नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संचालकांची बैठक झाली. यात या प्रकरणी पोलिस स्थानकात फिर्याद देण्याचा निर्णय झाला. या अनुषंगाने रावेर बाजार समितीचे उपसचिव नितीन महाजन यांनी सावदा पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार जुनेदखान जफरखान (रा.सावदा) व आसिफ खलिल भाट (रा.आंदलवाडी ता.रावेर) या दोघांच्या विरुद्ध काल रात्री सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.