बंदीवान कैद्याच्या मृत्यूनंतर कारागृहात इतर कैद्यांनी पुकारले उपोषण

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव  शहरातील जिल्हा कारागृहात असलेल्या पवन महाजन या बंदिवान कैद्याचा मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, या बंदीवान कैद्याच्या मृत्यूनंतर कारागृहात इतर कैद्यांनी उपोषण पुकारले असल्याची माहिती समोर येत आहे.

एरंडोल पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्यात पवन महाजन (वय २८) हा तरुण गेल्या तीन वर्षापासून जिल्हा कारागृहात होता. पवन याला मधुमेह असल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. तर  काही दिवसापूर्वी अचानक त्याची प्रकृती खालावल्याने त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी मध्यरात्री नंतर दोन वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

सदर घटनेनंतर कारागृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पवनचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच कारागृह प्रशासनाविरुद्ध कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. पवन महाजन याच्या मृत्यूनंतर कारागृहातील इतर कैद्यांनी दुपारचे जेवण घेण्यास नकार दिला असून उपोषणाचा पवित्रा घेतल्याची माहिती समोर येत आहे. कारागृहातून जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी जात असलेल्या एका बंदिवान कैद्याने यास दुजोरा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.