प्रवासी एसटीपासून दूर जाण्याचा मनस्थितीत….

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शासनासह संपावरील एसटी कर्मचारी असे कोणीही आता जास्त ताणू नये. अन्यथा प्रवासी एसटीपासून कायमस्वरूपी दूर जातील. अती तिथे माती होते, हे लक्षात असू द्यावे. प्रवाशांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. कारण खासगी वाहतूक दारांच्या मनमानीमुळे आम्ही त्रस्त आहोत. आम्हाला रस्त्यावर उतरण्यास बाध्य करू नये, अशा शब्दांत गेल्या ६० दिवसांपासून सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अन् त्यामुळे होत असलेल्या त्रासाबद्दल प्रवाशांनी मनातील संताप व्यक्त केला.

शासनाने विलीनीकरणाच्या मुद्यावर कोणताही तोडगा काढला नसल्याने एसटी कर्मचारी ऐतिहासिक संप मागे घेण्यासच तयार नाहीत. पगारवाढीशी आम्हाला घेणे – देणे नाही, असे एसटी कर्मचारी म्हणतात. अशात प्रवाशांची मात्र पुरती परवड होत आहे. त्यांना दीड दुप्पट दर मोजून खासगी – वाहनाने त्रासदायक प्रवास करावा लागत आहे.

शासनाने एकतर तोडगा काढावा किंवा संपावरील कर्मचाऱ्यांनी तरी सामोपचाराने घ्यावे. त्यांनी प्रवाशांचे हित बघावे. कारण यात खरा फटका बसला आहे तो प्रवासी, विद्यार्थी, चाकरमाने यांना. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत काहीतरी तडजोड – व्हायलाच हवी, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.