पावसाचा कहर.. 47 जणांचा मृत्यू; नाशिकचे 27 यात्रेकरु अडकले

0

उत्तराखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

उत्तराखंडमधील कुमाऊं परिसरात पावसाने हाहाकार माजला आहे. याठिकाणी गेल्या दोन दिवसात जोरदार पावसामुळे अनेक घरे वाहून गेली. या आपत्तीमुळे सुमारे 47 नागरिकांचा मृत्यू झालाय तर अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. पाऊस आणि खराब हवामानामुळे नैनितालचा संपर्क तुटला होता, तो आता पूर्ववत करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

नाशिकचे 27 यात्रेकरु अडकले 

नाशिकचे 27 यात्रेकरु नैनितालला गेले होते. पण गेल्या 30 तासांपासून नैनितालमध्ये जोरदार पाऊस असल्याने देशभरातले पर्यटक अडकून पडले आहेत. नाशिकचे पर्यटकही यामध्ये आहेत. त्यांनी नैनितालमधील भीषण परिस्थितीचा ‘आँखो देखा हाल’ नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातला.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी लगोलग नैनिताल प्रशासनाशी संपर्क साधला. यानंतर अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी नेण्याची नैनिताल प्रशासनानने व्यवस्था केली. पर्यटकांची काळजी घेऊ, त्यांना लागेल ती मदत करु, असं नैनिताल प्रशासनाने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना आश्वस्त केलं.

एकट्या कुमाऊं परिसरात प्राण गमावलेल्यांची संख्या 40 पेक्षा जास्त आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक निलेश आनंद भरणे यांनी यांनी दिली, असं PTI वृत्तसंस्थेने सांगितलं. नैनिताल जिल्ह्यात 28, अल्मोडा आणि चंपावतमध्ये प्रत्येकी 6 पिथौरागढ आणि उधमसिंह नगर जिल्ह्यात प्रत्येकी एक जणाचा मृत्यू झाला.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी हेलिकॉप्टरमधून अतिवृष्टी प्रभावित परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पूर प्रभावित नागरिकांशी चर्चाही केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री धामी यांच्याशी फोनवर पुरासंदर्भात चर्चा केलं. केंद्राकडून शक्य ती सगळी मदत करण्यात येईल, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी त्यांना दिलं आहे.

रुद्रप्रयाग, नैनिताल आणि उधमपूर नगर जिल्ह्यात पावसाचा फटका बसलेल्या लोकांशी चर्चा करताना धामी म्हणाले, “या संकट काळात धीर खचू देऊ नका.” मुख्यमंत्री धामी यांनी अतिवृष्टीमुळे प्राण गमावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

दरम्यान, खराब हवामान आणि सलग पाऊस असूनही नैनितालचा बंद झालेला मार्ग उघडण्यात प्रशासनाला यश आलं आहे, असं पोलीस महानिरीक्षक भरणे यांनी सांगितलं. वाहतूक सुरळीत केल्यानंतर नैनितालमध्ये अडकलेल्या पर्यटकांची कलाधुंगी आणि हल्दानी मार्गे सुटका करण्यात आल्याची माहिती भरणे यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.