पाचोरा येथे रविवार पासुन १७ मे पर्यंत जनता कर्फ्यू

0
 पाचोरा ️ प्रतिनिधी
पाचोरा येथे कोरोना विषाणूचे ढग गडद होत असून गुरुवारी जे अहवाल प्राप्त झाले. त्यात ६ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात पाचोरा येथील एक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा ही समावेश असल्याने यंत्रणा अक्षरशः हादरली आहे ही बाब गांभीर्याने घेऊन आमदार किशोर पाटील यांनी शुक्रवारी सकाळी पोलिस, महसुल व पालिका अधिकारी व नंतर आरोग्य अधिकारी यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन झूम ॲप द्वारे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. सर्व व पक्ष प्रमुखांशी बोलणे करून रविवार दि. १० मे ते १७ मे पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आल्याचे आमदार किशोर पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. तसेच पत्रकारांनी उपस्थित केलेल्या विविध सूचनां संदर्भात त्वरित निर्णय घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासित केले. ७ दिवसांच्या या जनता कर्फ्युस सर्वांनी सहकार्य करून घट्ट होत असलेली साखळी तोडावी असे आवाहनही केले.
आमदार किशोर पाटील यांनी शुक्रवारी सकाळी उपविभागीय अधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी तहसिलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, पालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले उपस्थित होते. या बैठकीत आमदारांनी कोरोना संदर्भातील एकूणच परिस्थितीचा आढावा घेऊन प्रतिबंधात्मक उपाय योजनांकडे होत असलेल्या दूर्लक्षा बाबत नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यां मधील परस्पर विरोधी मतप्रणालीतुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे स्पष्ट करून अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. व शहरातील प्रतिबंधित क्षेत्र, विलगीकरण कक्ष, बाधितांची परिस्थिती, त्यांच्यावरील उपचार यासंदर्भात माहिती घेतली. सध्या सारोळा रोडवरील समर्थ लॉन्स, भडगाव रोडवरील स्वप्नशिल्प रेसिडेन्सी, शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटल, राजीव गांधी टाऊन हॉल याठिकाणी बाधीत रुग्ण, त्यांचे कुटुंबीय व संपर्कात आलेल्यांना कॉरंटाईन करण्यात आले असुन आता वरखेडी रोडवरील साईमोक्ष हे मंगल कार्यालय देखील अधिग्रहित करण्यात आल्याचे स्पष्ट केले. स्थानिक वरिष्ठ पोलिस अधिकारी बाधित झाल्याचे निष्पन्न झाल्याने कोरोनाशी लढणारी एकुणच सर्व यंत्रणा कमालीची हादरली असली तरी कोरोनाशी लढवून युद्ध जिंकायचेच आहे. म्हणून सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यावे व कठोर नियमांची अंमलबजावणी करून कोरोनाची साखळी तोडावी अशा सूचना दिल्या.
राजकीय पक्ष पदाधिकार्‍यांशी चर्चा* अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर आमदार किशोर पाटील यांनी राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वाघ, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष साहेबराव पाटील, भाजपाचे सदाशिव पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून कोरोना नियंत्रित करण्यासाठी त्यांची मते जाणुन घेतली व कोरोनाची घट्ट होत असलेली साखळी खंडित करण्यासाठी जनता कर्फ्यू  पाळण्याबाबत मते जाणून घेऊन १७ मे पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे सूचित केले. त्यास सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी मान्यता दिली.
आरोग्य कार्यालयास भेट*
 आमदार किशोर पाटील यांनी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयास भेट देऊन तेथे उपस्थित डॉक्टरांशी सविस्तर चर्चा केली. डॉ. समाधान वाघ, डाॅ. अमित साळुंखे, तहसिलदार कैलास चावडे, पोलिस निरीक्षक अनिल शिंदे हे यावेळी उपस्थित होते. शहर व तालुक्यातील बाधित व मृत्युमुखी पडलेले, त्यांचे कुटुंबीय व संपर्कात आलेले तसेच उपचार घेत असलेले यांच्या संदर्भात माहिती जाणून घेऊन कोरोना चाचणी गतिमान करण्यासंदर्भात आदेशित केले.
त्यानुसार तपासणीसाठीच्या ५०० किट्स उपलब्ध होणार असून कोरोनाशी लढणारे अधिकारी, कर्मचारी, मिडियाचे प्रतिनिधी यांनीही आपल्या तपासण्या करून घ्याव्यात व कोरोनाशी सुरू असलेले युद्ध जिंकण्यासाठी सजग व्हावे असे स्पष्ट केले.
विविध विभागांचे पथक नेमणार*
शहरात तील जळगाव चौफुली, जारगाव चौफूली, कॉलेज चौफुली या या शहर प्रवेशाच्या तीन प्रमुख ठिकाणी शहरात येणाऱ्यांची चौकशी व तपासणी करण्यासाठी पोलिस, महसूल व पालिका विभागाचे संयुक्त पथक तैनात करण्याचे आमदारांनी स्पष्ट केले. तसेच शहरात दुचाकी व इतर वाहनांनी येणाऱ्यांनाही ताब्यात घेऊन चौकशी करण्यात येईल जेणेकरून कोरोनाची बाधा शहरवासियांना होणार नाही. यासाठी पथकाने सजग रहावे असे आदेशित करण्यात आले.
 असा असेल १७ मे पर्यंत जनता कर्फ्यू*
सर्व अधिकारी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यांची संमती घेऊन रविवार दि. १० रोजी सकाळी १० वाजेपासून ते १७ मे रोजी मध्यरात्री पर्यंत ७ दिवस जनता कर्फ्यू पाळण्या संदर्भात निर्णय झाला असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी स्पष्ट केले. जनता कर्फ्यू काळात रूग्णालयाशी संलग्न मेडिकल व दुध डेअरी या व्यतिरिक्त इतर सर्व दुकाने, कृ.उ.बाजार समिती व भाजीपाला बंद राहील. दुध विक्री सकाळी ७ ते १० व सायंकाळी ५ ते ८ या वेळेतच होईल. या जनता कर्फ्यू साठी सर्वांनी सहकार्य करावे. जनता कर्फ्यू  यशस्वी करावा व कोरोनाची साखळी खंडित करावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच कोरोना बाधितांबाबत असलेला दृष्टिकोन बदलावा. त्यांना आपुलकीची वागणूक द्यावी असे सूचित केले.
*नमाज घरीच*
मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान निमित्ताने आपल्या घरीच नमाज अदा करणे सुरू केले आहे .येत्या २५ – २६ मे ला रमजान ईद असल्याने यावेळी देखील मुस्लिम बांधवांनी घराबाहेर न पडता घरातच नमाज व आपले धार्मिक विधी करावेत असे आवाहन त्यांनी केले. जनता कर्फ्यू काळात ऑनलाईन कापूस नोंदणीची प्रक्रिया शेतकऱ्यांनी शांततेत पार पाडावी. घराबाहेर पडू नये. नागरिकांनीही घाबरून जाऊ नये. पण काळजी घ्यावी. शासन व प्रशासनाचे नियम तंतोतंत पाळावेत. अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडताना मास्क व सॅनीटायझरचा वापर करावा. अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांनी देखील फिजिकल डिस्टनसिंगचे नियम पाळावे, आपण सुरक्षित राहिलो म्हणजे समाज, राष्ट्र व देश सुरक्षित राहील म्हणून “आपणच आपले रक्षक व्हा” आणि “कोरोनाला हरवा” असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी व्ही.सी. द्वारे पत्रकार परिषदेत केले.

Leave A Reply

Your email address will not be published.