जामनेराती घरफोडी: साडे आठ लाखांचा ऐवज लंपास

0

जामनेर (प्रतिनिधी): -शहरातील गिरीजा कॉलनी भागात राहणाऱ्या ७५ वर्षीय वयोवृद्ध दामत्यांकडे चोरट्यांनी धाडसी घरफोडी करून आठ लाख साठ हजार पाचशे रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना आज दि.८ रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर चोरट्यांनी पोलीसांसमोर अजून एक नवे आव्हान उभे केले आहे.

  सविस्तर वृत्त असे की,बळीराम जयराम माळी वय ७५ हे आपल्या पत्नीसह गिरीजा कॉलनी भागात राहत असून दि.७ रोजी रात्री झोपताना त्यांनी राहत्या घराचा मागील दरवाजा उघडा सोडलेला होता.त्याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात लोखंडी पेटीमध्ये ठेवलेले आठ लाख पन्नास हजार रुपये रोख,दहा हजार रुपयांचे सोन्याचे तुकडे व पाचशे रुपये किंमतीच्या जुनी लोखंडी पेटीसह एकूण आठ लाख साठ हजार पाचशे रूपयांचा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना दि.८ रोजी रात्री ३ ते ४ वाजेच्या सुमारास घडली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.माळी दाम्पत्य सकाळी झोपेतून उठल्यावर झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आला.तात्काळ त्यांनी पोलीस स्टेशन गाठले.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे हे श्वान व ठसे तंज्ञासह घटनास्थळी दाखल झाले.ठसे तंज्ञानी घटनास्थळावरून ठसाचे नमुने घेतले असून स्वानाने घरातल्या घरातच मार्ग दाखविलेला आहे.बळीराम जयराम माळी यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनमध्ये गु.र.न.१४२ /२०२० भा.द.वि.कलम ३८० प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.