पाचोरा तालुक्यातील हिवरा, सार्वे- खाजोळे ओव्हरफ्लो; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

पाचोरा तालुक्याच्या वरील भागात अजिंठा डोंगरमाळा लगत गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्याने पाचोरा तालुक्यातील हिवरा, सार्वे – खाजोळे हे प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असुन सातगाव (डोंगरी), घोडसगाव, धाकलेगाव, कोल्हे, लोहारा, बहुळा प्रकल्पाच्या जल साठ्यात किंचित वाढ झाली आहे.

चाळीसगाव तालुक्याच्या वरील भागात अतिवृष्टी होवुन तितुर व गढद नदीला मोठा पूर आल्याने व हिवरा प्रकल्प ओव्हरफ्लो होवुन एक फुट वाहु लागल्याने प्रकल्पाखालील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तितुर नदीचे पाणी गिरणेत आल्याने तितुर नदी वरील नगरदेवळा स्टेशन जवळ व पाचोरा तालुक्यातील ओझर, गिरड गावांच्या मध्यभागी असलेल्या पुलांवरुन पाणी वाहु लागल्याने रहदारी बंद झाली आहे.

उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी भडगाव येथे भेट देऊन नागरिकांना सतर्कत राहण्याचा इशारा दिला आहे. या पुरामुळे तालुक्यात सुदैवाने कोठेही जिवितहानी झालेली नाही.

पाचोरा तालुक्यालगत असलेल्या सोयगाव तालुक्यात वाडी – बनोटी परिसरात जोरदार पाऊस झाल्याने वाडी – बनोटी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने ते पाणी थेट हिवरा प्रकल्पात येत असल्याने हिवरा प्रकल्प आज दुपारी १२ वाजता ओव्हरफ्लो झाला. याशिवाय शिंडोळ – वडगाव परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे सार्वे – खाजोळे प्रकल्प ओव्हरफ्लो होवुन गढद नदीला पूर आला आहे. याशिवाय मुर्डेश्वर व जोगेश्वरी भागात पाऊस झाल्याने सातगाव (डोंगरी), घोडसगाव, धाकलेगाव प्रकल्पात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.

या गावांना सतर्कतेचा इशारा

तितुर नदीला मोठा पूर सुरू असल्याने घुसर्डी, होळ, वडगाव (सतीचे), नागणखेडा, बाळद बु” तर गिरणेला पुर आल्याने भट्टगाव, बांबरुड (महादेवाचे), पिंपळगाव खु”, पिंपळगाव बु”, मांडकी, ओझर, गिरड, भातखंडे खु”, भातखंडे बु”, दुसखेडा तर हिवरा नदी लगतच्या खडकदेवळा खु”, खडकदेवळा बु”, सारोळा खु”, सारोळा बु”, जारगाव, कृष्णापुरी, पाचोरा शहरातील बाहेरपुरा भाग, वडगाव (टेक), वडगाव (असेरी) या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.