रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
सात दिवसांपूर्वी वाघोड ता. रावेर येथून घरात काहीही न सांगता आठ वर्षाचा रुपेश भगवान बारेला हा मुलगा निघुन गेला होता. याबाबत रावेर पोलिस स्टेशन येथे हरवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी आपल्या शोधकार्याच्या बळावर रुपेश याचा अवघ्या सात दिवसात शोध लावून त्याला त्याच्या पालकांना सुपूर्द केला आहे. पोलिसांच्या या कार्यामुळे सर्वत्र त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, वाघोड ता.रावेर येथील भिमसिंग पारसिंग बारेला यांचा नातु रुपेश भगवान बारेला वय 8 वर्ष हा २४ मे रोजी दुपारी अडीच वाजता बाजारातुन कोणास काही एक न कळविता कोठेतरी निघुन गेला होता.रुपेश याचे काका अर्जुन भिमसिंग बारेला यांचे फिर्याद वरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर तपास उपनिरीक्षक प्रिया वसावे यांच्याकडे देण्यात आला होता. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन तसेच रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील खानापुर,चोरवड,पाल,अजंदा कुसुंबा अशा आजुबाजुच्या परीसात देखील सातत्याने शोध सुरु होता.
याच शोध मोहिमेत खानापुर येथील बस स्टॉप परिसरात सदर मुलास काही दुकानदारांनी पाहिल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर सदर मुलाचा शोध घेत असतांना तो यावल तालुक्यातील धुळ्यापाडा गावात असल्याबाबत माहीती मिळाली. हि माहिती पोलिस उपनिरीक्षक प्रिया वसावे यांनी फैजपुर उपविभागाच्या सहा. पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग यांना व रावेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक आशिष आडसुळ यांना तत्काळ कळवली. आणि सदर मुलाला सुखरुपपणे धुळ्या पाडा ता. यावल येथुन ताब्यात घेतले. त्यानंतर मुलाला त्याच्या कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले. गुन्ह्याच्या तपासकामी सहायक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग व रावेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक आशिष आडसुळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रिया वसावे यांनी केला. सदर गुन्हा तपासात रावेर पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ अर्जुन सोनवणे, पो.कॉ सचिन घुगे, पो.कॉ रविंद्र भामरे यांनी मदत केली.