बाऱ्हे-आंबोडे रस्त्याची झाली दैना.. “खड्डयात रस्ता की, रस्त्यात खड्डा”

0

सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क

सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे ते आंबोडे रस्त्याची दयनीय अवस्था झाली. त्यामुळे “खड्ड्यात रस्ता की, रस्त्यात खड्डा” अशी परिस्थिती निर्माण होऊन वाहनधारक, शेतकरी, नागरिक बेजार झाले आहेत. परिणामी वाहन चालकांना तारेवरची कसरत करून वाहन चालवावे लागत आहे.

सुरगाणा हा आदिवासी तालुका आहे. माञ त्यालाच लागून धरमपुर, नासिक, दिंडोरी, पेठ अशा मोठमोठया बाजारपेठा असल्याने या भागातील शेतकरी, नागरिक, वाहनधारक व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या गाड्या याच रस्त्यावरून सतत ये- जा करत असतात. नासिक ते आंबोडे ८० ते ९० कि.मी. अंतर रस्ता चांगला असल्याने सव्वा तास ते दीड तासात बाऱ्हे पर्यंत येतात.

परंतु बाऱ्हे ते आंबोडे रस्ता खड्डेमय झाल्याने आंबोडे गाठायला बराच वेळ लागतो. दळणवळणाच्या दृष्टीने मुख्य रस्ता असल्याने या रस्त्याची झालेली दैना बघून वाहनधारक ञस्त झाले आहेत. बाऱ्हे ही एक मोठी बाजारपेठ असून, याच रस्त्यावरून तीस ते चाळीस गावे व वीस ते तीस छोट्या मोठ्या खेड्या, पाड्यातील वाहन धारकांना कशीबशी खड्ड्यातून वाट काढत यावे लागते.

काही ठिकाणी रस्त्याच्या कडा पावसामुळे तुटून रस्ता धोकादायक बनला आहे. एका ठिकाणी तर रस्त्यातच मध्यभागी छोटा बोगदा पडला आहे. याचा प्रवासी व वाहनधारकांना नाहकच ञास सहन करावा लागत आहे.

तसेच बाऱ्हे येथे सर्वच विभागाचे कार्यालये, ग्रामीण रूग्णालय, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय आहेत. आंबुपाडा बे. येथे आदिवासी विभागाचे माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, फिरते पथक असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये – जा चालू असते. मागील दोन ते तीन वर्षापासून नुसते खड्डे भरण्याचे काम चालू आहे. बाऱ्हे ते आंबोडे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे प्रवास करताना वाहन धारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. एखादी महिला दवाखान्यात बाळंतपणासाठी न्यायची असली तर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे असल्याने गाडी आदळत चालते, त्यामुळे बाळंतपण गाडीतच होईल अशी वेळ नाकारता येत नाही. प्रशासनाने बाऱ्हे ते आंबोडे रस्त्याचे डांबरीकरण,चांगली दुरूस्ती केल्यास हा प्रश्न लवकर मार्गी लागेल व वाहनधारक सुखावतील अशी परिसरातील जनतेची अपेक्षा आहे.

कळवण – सुरगाणा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीन पवार यांचेकडे या रस्त्याचे निवेदन दिले आहे.या रस्त्याचा त्यांच्याकडे सतत पाठपुरावा चालू आहे. त्यामुळे निश्चितच या रस्त्याचे लवकरच डांबरीकरण केले जाईल.
– गोपाळराव धुम, ठाणगाव, मा.जि.प.सदस्य

Leave A Reply

Your email address will not be published.