पत्नीस जीवेठार मारुन अपघातात मृत्यू झाल्याचा केला बनाव ; पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील राजीव गांधी काॅलनीत वास्तव्यास असलेल्या २३ वर्षाच्या विवाहीतेस पतीने जीवेठार मारून अपघाताचा बनाव करत गुन्हा लपविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी पतीने मयत पत्नीस सोयगाव पोलिस स्टेशनमध्ये पोलिस कर्मचारी असलेल्या बहिणीच्या घरी नेण्याचा बहाना करून तालुक्यातील आंबे वडगाव जवळ वाहनाचा खोटा अपघात घडविला. त्यात पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला असल्याची खबर पत्नीच्या वडिलांना दिली. मात्र वाहन पलटी होऊनही पतीस साधे खरचटले सुध्दा नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांचा संशय बळावून व मयताच्या आईने माझ्या मुलीला जावयाने प्रथम वाहणातच जीवेठार मारले. व त्यानंतर वाहन पलटी केले अशी फिर्याद दिल्याने पतीसह पाचोरा पोलीस स्टेशनला पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पतीस ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा शून्य क्रमांकाने पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे.

पाचोरा शहरा लगत असलेल्या राजीव गांधी कॉलनीतील रहिवाशी मुकेश रमेश मिस्त्री (सोनवणे) याचा विवाह धुळे येथील साई प्रसाद कॉलनी  येथील अश्विनी दिपक शेलार हिचे सोबत दि. १४ मे २०१९ रोजी पाचोरा येथे मोठ्या थाटात झाला होता. मात्र लग्नानंतर काहीच दिवसांनी अश्विनी हिचा पती, सासू व नणंद यांनी गांजपाठ सुरु केला. तसेच पती मूकेशने नासिक येथील कुंदा भागवत सहाणे हिच्याशी माझे प्रेम संबंध आहेत. मला तु आवडत नाही. असे सांगितले. तद्नंतर अश्विनी ही सासरी नांदत असतांनाच कुंदा सहाणे ही पाचोरा येथे येऊन राहू लागली व त्यांनतर अश्विनी हिस तिघी नंदा व सासू नेहमी हिणवुन व शिवीगाळ करून मारहाण करू लागल्या तर पती मुकेश याने स्विफ्ट डिझायर गाडी घेण्यासाठी तुझ्या वडिलांकडून ५ लाख रुपये घेऊन ये, नाहीतर मी तुला मारून टाकेल अशी धमकी देत असल्याने अश्विनी तिची आई संगीताबाई दिपक शेलार हिस भ्रमणध्वनीद्वारे माहिती दिली. काही दिवसांनी मुलीस जास्तच त्रास होत असल्याने मुलीचे आई – वडील पाचोरा येथे येऊन मुकेश, सुमनबाई रमेश सोनवणे (आई),  सविता दिनेश मराठे (नणंद), कविता रमेश सोनवणे (नणंद), रेखा वाडेकर (नणंद) यांची समजूत घालत असतांना त्यांनी काही एक ऐकून न घेता तुम्ही आम्हाला ५ लाख रुपये आणून द्या नाहीतर आम्ही मुकेशचे लग्न कुंदा भागवत सहाणे हिच्याशी लावून देऊ असे सांगितल्यानंतर आम्ही मुलीस धुळे येथे घेऊन आलो. त्यांनतर २२ एप्रिल २०२१ रोजी मुकेश मिस्त्री (सोनवणे) हा धुळे येथे येऊन मी अश्विनीस यापुढे चांगले वागवेल असे लेखी हमीपत्राद्वारे लिहून दिल्यानंतर त्यांनी अश्विनी हिस पाचोरा येथे पतीसोबत पाठविले.

दरम्यान मुकेश रमेश मिस्त्री (सोनवणे) हा दि. २३ रोजी रात्री सोयगाव येथे राहत असलेल्या त्याची बहीण कविता रमेश सोनवणे हिच्याकडे अश्विनी हिस घेऊन जाण्याचा बहाणा करून एम. एच. १५ ई. ई. ०७८७ (क्रेटा) या पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून घेऊन गेला. दरम्यान पाचोरा तालुक्यातील आंबे वडगाव गावापासून काही अंतरावर गाडी पलटी होऊन त्यात अश्विनीचा जागीच मृत्यू झाला असल्याचे भ्रमणध्वनीद्वारे दिपक पांडुरंग शेलार (सासरे) यांनी कळविले. मात्र गाडी पलटी होऊन मुकेश यास साधे खरचटले सुध्दा नाही तर अश्विनी हिच्या डोक्यावर, उजव्या हातावर, पाठीवर मोठ्या जखमा असून तिची कवटी फुटल्याने तिचा जागेवर मृत्यू झालेला होता. या मृत्यूस कारणीभूत धरून अश्विनी हिची आई संगिता दिपक शेलार यांनी पती मुकेश रमेश मिस्त्री (सोनवणे), सासू सुमनबाई रमेश सोनवणे (रा. पाचोरा), नणंद सविता दिनेश मराठे (रा.भडगाव), रेखा वाडेकर (रा.जळगाव), कविता रमेश सोनवणे (रा. सोयगाव), कुंदा भागवत सहाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मयताच्या शवविच्छेदनासाठी दिरंगाई

अश्विनी मुकेश सोनवणे हिचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूदेह दि.२४ रोजी मध्यरात्री पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे. मात्र दुसऱ्या दिवशी सायंकाळ होऊनही तिचे वडील दिपक पांडुरंग शेलार यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथील मेडिकल कॉलेजात नेणार असल्याचा हट्ट धरला होता. जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करू न देण्याचा आग्रह धरल्याने सायंकाळी ५ वाजेपर्यंत शवविच्छेदन झालेले नव्हते. अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचोरा येथेच ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी शवविच्छेदन केले.

संशयित आरोपी मुकेश यास कोरोनाची लागण

मयत अश्विनी हिचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर मुकेश याच्या छातीत दुखू लागल्याने त्याने मला कोरोना झाल्याचा भास होत असून मी दोन दिवसांपूर्वी स्वॅब दिलेला आहे. असे सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात कोरोनाची रॅपिड टेस्ट करून घेतली असता त्यात मुकेश याचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.